

अहमदाबाद : गेल्या दोन ते तीन दशकात काही गंभीर आजारामुळे आरोग्य सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातील एक आहे कर्करोग. हा आजार केवळ वाढत्या वयामुळे होत नाही तर लहान मुलांबरोबरच तरुणांनाही तो होत आहे. पूर्वी कर्करोग म्हणजे मृत्यू असे समीकरण होते. आता नवनवीन शोधांनी कर्करोगांवर उपचार शक्य झाले असून रुग्ण बरे होऊ लागले आहेत. आता झायडस कंपनीने विविध कर्करोगांवर उपयुक्त असलेले औषध बाजारात आणले आहे. विशेष म्हणजे हे औषध अन्य कंपन्यांपेक्षा एक चतुर्थांश किंमतीत उपलब्ध आहे.
‘झायडस’ कंपनीने भारतात कर्करोगासाठी ‘बायोसिमिलर’ औषध आणले आहे. ‘बायोसिमिलर’ म्हणजे ही औषधे कोणत्याही ब्रँडनेम असलेल्या औषधांसारखीच काम करते. ही औषधे यीस्ट, जीवाणू यांच्यापासून बनवली जातात. विशेष म्हणजे याच्या किंमत कमी असतात.
‘झायडस’ने सांगितले की, ‘निवोलुमॅब’ या औषधाचा पहिला बायोसिमिलर भारतात कंपनीने सर्व कर्करोगासाठी बाजारात दाखल केला. भारतात त्याचे नामकरण ‘तिष्ठा’ असे केले आहे. ‘निवोलुमॅब’ हे रोग प्रतिकारक औषध आहे जे कर्करोगांच्या पेशींशी लढण्यास मदत करते. ‘निवोलुमॅब’च्या १०० मिलीग्रॅमची किंमत ५० हजार ते एक लाख असते.
‘झायडस’ने शेअर बाजाराला कळवले की, ‘तिष्ठा’ची किंमत १०० मिलीग्रॅमला २८,९५० रुपये तर ४० मिलीग्रॅमची किंमत १३,९५० रुपये असेल. कर्करोगावरील औषधांच्या किंमतीच्या एक चतुर्थांश ही किंमत आहे.
५ लाख रुग्णांना फायदा होणार
‘झायडस लाइफ सायन्सेस’चे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल म्हणाले की, ‘तिष्ठा’ हे औषध बाजारात आणल्याने रुग्णांना आवश्यक असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीची गरज पूर्ण होईल. कर्करोगग्रस्त रुग्णांना उच्च दर्जाची बायोसिमिलर इम्युनोथेरपी सहजपणे मिळावी यासाठी कंपनी प्रतिबद्ध आहे. या औषधाचा फायदा ५ लाखाहून अधिक रुग्णांना होऊ शकतो.