नवी दिल्ली: भारताने चाबहार बंदरावरील निर्बंध हटवण्यासाठी अमेरिकेशी संवाद साधावा, अशी सूचना अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी केली आहे.
भारताच्या दौऱ्यावर असलेल्या तालिबान शासित अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, त्यांचा देश या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या बंदराचा अधिकाधिक वापर व्हावा याच्या बाजूने आहे आणि त्यांनी या संदर्भात अमेरिकेबरोबरच्या बैठकीत निर्बंध हटवण्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे.
मुत्ताकी यांनी भारताकडून अधिक व्हिसा जारी करण्याची मागणी करत व्यापारी, वैद्यकीय आणि लोकांमधील परस्पर देवाणघेवाण वाढवण्यावर भर दिला.
इराणच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले चाबहार बंदर विकसित करण्यात भारत हा प्रमुख भागीदार आहे. सध्या भारत या बंदरावरील 'शहीद बेहेश्ती' टर्मिनल चालवित आहे.
सप्टेंबरमध्ये ट्रम्प प्रशासनाने इराणमधील या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदराशी संबंधित २०१८ च्या निर्बंध सवलतीचा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
'चाबहारबाबत आमचे मत आहे की, त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा. दोन्ही देशांनी निर्बंध उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही अमेरिकेशी भेटीत हा मुद्दा मांडला आहे आणि भारतानेही तसेच करावे. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणाऱ्या अफगाण नागरिकांची संख्या आणखी वाढवावी. आत्ताही लोक येतात, पण अधिक यायला हवेत," असे ते म्हणाले.
भारतात होणाऱ्या व्यापार मेळे प्रदर्शनांमध्ये सहभागी आणि अफगाणिस्तानला होण्यासाठी आमंत्रित करावे, तसेच भारतीय उद्योगांनी खाणकाम, वीज निर्मिती आणि शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये अफगाणिस्तानात गुंतवणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.
ते येथील उद्योग मंडळ 'फिक्की' ने आयोजित केलेल्या एका संवादात्मक सत्रात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी बोलत होते.