राकेश शर्मा यांच्यानंतर आता शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावणार; दुसरा भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज

स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हे १९८४ मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. त्यानंतर आता शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
राकेश शर्मा यांच्यानंतर आता शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावणार; दुसरा भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज
Published on

नवी दिल्ली : स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हे १९८४ मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. त्यानंतर आता शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अंतराळ स्थानकात तब्बल २८५ दिवसांच्या वास्तव्यानंतर भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अमेरिकेचे बुच विल्मोर हे नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यानंतर आता शुभांशू शुक्लाच्या रूपाने आणखी एक भारतीय अंतराळात झेपावणार आहे.

मिशन ४ (एएक्स-४)

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे ॲक्झिओम मिशन ४ (एएक्स-४) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. ते इंडियन एअर फोर्समधील एक अनुभवी वैमानिक आहेत. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानात मिशन पायलट म्हणून ते काम पाहणार आहेत. गगनयान मोहिमेचा देखील भाग असलेल्या शुक्ला यांच्या अंतराळ मोहिमेचा प्रारंभ किंवा प्रक्षेपण मे २०२५ मध्ये फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे. हे मिशन भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनातील सहभागासाठी देखील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे.

चार भारतीय अंतराळवीर

गगनयान मोहिमेत चार भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठवले जाणार आहेत. त्यात शुभांशू शुक्ला यांच्यासह प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप यांचाही समावेश आहे. तथापि, या मोहिमेला अजून अवकाश आहे. तत्पूर्वी शुभांशू हे ॲक्झिओम मिशन ४ (एएक्स-४) अंतर्गत अंतराळात जाणार आहेत.

१४ दिवसांची मोहीम, योगासने करणार

एएक्स-४ मिशनचे नेतृत्व माजी नासा अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत, तर पोलंडचे सावोश उझनान्स्की-विश्निव्हस्की आणि हंगेरीचे तिबोर कापू मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहभागी असतील. ही १४ दिवसांची मोहीम सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक उपक्रम आणि व्यावसायिक कार्यांसाठी आयोजित केली आहे. शुक्ला भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतांतील कलावस्त्र ते सोबत नेणार आहेत आणि अंतराळात योगासने सादर करणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे जागतिक अंतराळ संशोधनात भारताच्या वाढत्या भूमिकेवरही प्रकाश टाकला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in