‘अग्निपथ’ योजना सुरुच राहणार,संरक्षण खात्याचा निर्णय

अग्निपथ’ योजना मागे घेतली जाणार नसून सर्व भरती या योजनेंतर्गत होणार आहे.
 ‘अग्निपथ’ योजना सुरुच राहणार,संरक्षण खात्याचा निर्णय

केंद्र सरकारने सैन्य दलासाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून हिंसक वळण लागले आहे. तरीही योजना ठामपणे सुरू ठेवण्याचा निर्धार संरक्षण खात्याने रविवारी घेतला आहे.

संरक्षण मंत्रालयाने रविवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत तिन्ही दलांनी या योजनेच्या अंमलबजावणीचा पुनरूच्चार केला. ‘अग्निपथ’ योजना मागे घेतली जाणार नसून सर्व भरती या योजनेंतर्गत होणार आहे. २५ हजार अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबरमध्ये सैन्यात दाखल होणार आहे.

लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अग्निपथच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. ‘अग्निवीर’ होणारी व्यक्ती आपण कोणतेही निदर्शने किंवा तोडफोड केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र देईल, असे ते म्हणाले. पोलिस पडताळणीशिवाय कोणीही सैन्यात भरती होणार नाही. तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तयार असले पाहिजे, जेणेकरून ते आमच्यासोबत सामील होऊन प्रशिक्षण घेऊ शकतील. या योजनेवर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा आम्हाला अंदाज नव्हता. सशस्त्र दलात शिस्तभंगाला स्थान नाही. कोणत्याही प्रकारच्या जाळपोळ/हिंसेमध्ये सहभागी होणार नाही, हे प्रत्येकाला लेखी द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

अनिल पुरी म्हणाले- लष्करातील बदलाची ही प्रक्रिया १९८९ पासून सुरू आहे. लष्कराचे सरासरी वय ३२ वर्षे होते, ते २६ पर्यंत खाली आणण्याचे आमचे लक्ष्य होते. यावर दोन वर्षे संशोधन करण्यात आले. तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस यांनी जगातील सर्व देशांच्या लष्कराचे सरासरी वय पाहिले. सैन्यात तरुणांची गरज आहे. उत्कटतेबरोबरच जाणीवही हवी.

ज्या दिवशी अग्निपथची घोषणा झाली, त्यादिवशी दोन घोषणा झाल्या, पहिली देशभरात साडेदहा लाख नोकऱ्या आणि सैन्यात अग्निवीरच्या रूपाने ४६ हजार जागा, पण लोकांपर्यंत फक्त ४६ हजार माहिती पोहोचली. कोरोनामुळे वयात बदल करण्यात आला.

येत्या ४ ते ५ वर्षांत आपल्या सैनिकांची संख्या ५० ते ६० हजार होईल आणि नंतर ती १ लाखांपर्यंत वाढेल. आम्ही योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी ४६ हजार पासून सुरुवात केली आहे. या योजनेतील बदल भीतीपोटी नव्हते तर अगोदरच तयार होते, असे पुरी म्हणाले.

या पत्रकार परिषदेला लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी, भारतीय लष्कराचे अ‍ॅडज्युटंट जनरल लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा, भारतीय नौदलाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि भारतीय हवाई दलाचे कार्मिक प्रभारी एअर मार्शल सूरज झा हे उपस्थित होते.

भारतीय नौदलाने सांगितले की, येत्या २१ नोव्हेंबरपासून पहिली नौदल अग्निवीर तुकडी ओडिशातील ‘आयएनएस चिल्का’ या प्रशिक्षण संस्थेत पोहोचण्यास सुरुवात करेल. यासाठी पुरूष आणि महिला अग्निविरांना परवानगी असेल. भारतीय नौदलात सध्या भारतीय नौदलाच्या विविध जहाजांवर ३० महिला अधिकारी आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत महिलांचीही भरती करू, असे आम्ही ठरवले आहे. त्यांना युद्धनौकांवरही तैनात केले जाईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in