‘अग्नी प्राइम’ची चाचणी यशस्वी

‘अग्नी’ मालिकेतील १ ते ४ या क्षेपणास्त्रांचा पल्ला ७०० ते ३५०० किमी दरम्यान आहे, तर ‘अग्नी-५’चा पल्ला ५००० किमी आहे. गेल्या महिन्यात भारताने 'मिशन दिव्यास्त्र'अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची 'मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल' (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह यशस्वीरित्या चाचणी घेतली.
‘अग्नी प्राइम’ची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : भारताने बुधवारी सायंकाळी ‘अग्नी प्राइम’ या नवीन पिढीच्या स्वदेशी अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली, अशी माहिती गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ‘अग्नी प्राइम’ या क्षेपणास्त्राचा पल्ला १००० ते २००० किमी असून ते अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. बुधवारची चाचणी ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राची रात्रीच्या वेळची कामगिरी तपासण्यासाठी घेतली होती. भारतीय सेनादलांच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) संयुक्तरीत्या ही चाचणी घेतली. ओदिशाच्या किनाऱ्यावरील अब्दुल कलाम बेटावरून बुधवारी सायंकाळी ७ वाजता क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्याने चाचणीची सर्व उद्दिष्ट्ये समाधानकारकरीत्या पूर्ण केल्याचे संरक्षण खात्याच्यावतीने सांगण्यात आले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचे प्रमुख, डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रक्षेपणावेळी उपस्थित होते.

‘अग्नी’ मालिकेतील १ ते ४ या क्षेपणास्त्रांचा पल्ला ७०० ते ३५०० किमी दरम्यान आहे, तर ‘अग्नी-५’चा पल्ला ५००० किमी आहे. गेल्या महिन्यात भारताने 'मिशन दिव्यास्त्र'अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची 'मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल' (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह यशस्वीरित्या चाचणी घेतली. या तंत्रज्ञानाद्वारे एकाच क्षेपणास्त्रावर अनेक अण्वस्त्रे बसवून ती एकाच वेळी शत्रूच्या विविध लक्ष्यांवर डागता येतात. त्यामुळे भारत आता असे तंत्रज्ञान असलेल्या जगातील मूठभर देशांच्या पंक्तीत बसला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in