
नवी दिल्ली : भारताने रेल्वे-आधारित मोबाईल लाँचर सिस्टमवरून मध्यम-श्रेणीच्या अग्नी-प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडसाठी (एसएफसी) विकसित करण्यात आले आहे. ओदिशातील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारतासाठी ही गर्वाची बाब आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तान टप्प्यात येणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले की, अग्नी-प्राईम चाचणी ही विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित मोबाईल लाँचरवरून घेण्यात आलेली अशा प्रकारची पहिली चाचणी होती. पुढील पिढीतील अग्नी-प्राईम क्षेपणास्त्र २००० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते, म्हणजेच या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान येतो.
विशेष डिझाइन केलेल्या रेल्वे लाँचरवरून हे क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भारत अशा काही देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे, ज्यांच्याकडे कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम आहे, जी चालत्या ट्रेनवरुन क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे. आतापर्यंत रशिया, चीन, उत्तर कोरिया या देशांनीच हे केले आहे. आता यामध्ये भारताचाही समावेश झाला आहे. हे करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.
अग्नी-प्राईम हे अग्नि मालिकेतील सर्वात नवीन आणि सर्वात प्रगत क्षेपणास्त्र आहे. हे २००० किलोमीटरपर्यंतच्या श्रेणीचे मध्यम-श्रेणीचे क्षेपणास्त्र आहे. त्यात अनेक नवीन आणि प्रगत वैशिष्ट्ये आहेत.अग्नी-प्राईम हे अचूक निशाणा साधण्यात सक्षम आहे. त्याच्या प्रगत नेव्हिगेशन सिस्टमसह, ते शत्रूच्या ठिकाणांना अचूकपणे लक्ष्य करु शकते. जलद प्रतिक्रिया हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ते कमी वेळात लाँच केले जाऊ शकते. मजबूत रचना ही अग्नी-प्राईमची ओळख आहे.
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
हे कॅनिस्टरमध्ये (बंद बॉक्स) ठेवले जाते. हे पाऊस, धूळ किंवा उष्णतेपासून त्याचे संरक्षण करते. हे क्षेपणास्त्र रेल्वे नेटवर्कवर कोणत्याही तयारीशिवाय चालवता येऊ शकते. हे क्षेपणास्त्र देशांतर्गत गतिशीलता प्रदान करते. म्हणजेच ते जंगलात, पर्वतांमध्ये किंवा मैदानी भागात सहजपणे वाहून नेले जाऊ शकते. ते कमी दृश्यमानतेमध्येही चालवता येते. धुक्यात किंवा रात्रीही हे क्षेपणास्त्र सुरक्षित आहे, अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.