

नवी दिल्ली : जवळपास ४,००० अग्निवीरांचा संवेदनशील वैयक्तिक डेटा हॅक करून डार्क वेबवर ५०० अमेरिकी डॉलरला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरयाणातील वल्लभड येथील १४ वर्षीय मुलास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे.
अन्य माजी अग्निवीरांना सरकारी विभागांमध्ये रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी नोंदणी करता यावी, म्हणून तयार करण्यात आलेल्या चाचणी संकेतस्थळावर आरोपी मुलाने घुसखोरी केली. त्यानंतर त्याने माहिती मिळवून डार्क वेबवर सुमारे ४,००० अग्निवीरांचा डेटा असल्याची जाहिरात केली आणि तो ५०० डॉलरला विकण्याची तयारी दर्शविली होती. चौकशीनंतर आरोपी मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून, डेटा अन्य कोणाकडे पोहोचला का, याचा तपास सुरू आहे.
एआयचा वापर करून घुसखोरीचा संशय
या प्रकरणात आरोपीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्याचा संशय आहे. त्याने संकेतस्थळात नेमकी कशी घुसखोरी केली, याचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ पथकाने आरोपी मुलाच्या डिजिटल उपकरणांमधून डेटा हस्तगत केला आहे. तो खरा आहे का, याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अग्निवीरांची अधिकृत माहिती मागविण्यात आली आहे.