अग्निवीरांचे सेवा प्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमांसाठी ग्राह्य धरले जाणार,केंद्रीय शिक्षण खात्याची घोषणा

संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी तीन वर्षांचा कौशल्य आधारित विशेष पदवी कार्यक्रम सुरू करणार आहे
अग्निवीरांचे सेवा प्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमांसाठी ग्राह्य धरले जाणार,केंद्रीय शिक्षण खात्याची घोषणा

सशस्त्र दलांमध्ये सेवा देता यावी यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिलेल्या अग्निपथ सैन्य भरती योजनेतील अग्निवीरांचे सेवा प्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमांसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण खात्याने केली. अग्निवीरांच्या करिअरच्या संधी वाढवण्यासाठी आणि नागरी क्षेत्रातील विविध नोकऱ्यांसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी, शिक्षण मंत्रालय सेवेत असलेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी तीन वर्षांचा कौशल्य आधारित विशेष पदवी कार्यक्रम सुरू करणार आहे.इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात ‘इग्नू’द्वारे रचना केलेल्या आणि अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत पदवीसाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी ५०% गुण अग्निवीरला मिळालेल्या तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक दोन्ही कौशल्य प्रशिक्षणातून मिळतील. उर्वरित ५०% गुण भाषा, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र, गणित, शिक्षण, वाणिज्य, पर्यटन, व्यावसायिक अभ्यासक्रम, कृषी आणि ज्योतिष यासारख्या विविध विषयांच्या तसेच इंग्रजीमधील पर्यावरण अभ्यास आणि संप्रेषण कौशल्यांवरील क्षमता बांधणी अभ्यासक्रम या विषयांच्या निवडलेल्या अभ्यासक्रमांमधून प्राप्त होतील.

हा कार्यक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाचे मापदंड आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अनिवार्य केल्यानुसार राष्ट्रीय गुण आराखडा/राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा यानुसार रचना केलेला आहे. यामध्ये प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केल्यावर पदवीपूर्व प्रमाणपत्र, प्रथम आणि द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केल्यावर पदवीपूर्व पदविका आणि तीन वर्षांच्या कालावधीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडण्याची तरतूद आहे.या कार्यक्रमाच्या आराखड्याला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोग या संबंधित नियामक संस्थांनी मान्यता दिली आहे. ‘इग्नू’द्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामपद्धतीनुसार (कला पदवी ; वाणिज्य पदवी; कला पदवी (व्यावसायिक); कला पदवी (पर्यटन व्यवस्थापन), पदवी प्रदान केली जाईल आणि रोजगार आणि शिक्षणासाठी भारतात आणि परदेशात या पदवीला मान्यता असेल.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दल ‘इग्नू’सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in