२०३० पर्यंत कृषी निर्यात दुप्पट होईल; १०० अब्ज अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता: वाणिज्य सचिव

आयात करणाऱ्या देशांच्या तांत्रिक मानक आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही त्यांनी उद्योगांना केले.
२०३० पर्यंत कृषी निर्यात दुप्पट होईल; १०० अब्ज अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता: वाणिज्य सचिव

ग्रेटर नोएडा : भारताची कृषी निर्यात येत्या २०३० पर्यंत दुप्पट होऊन १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या कृती निर्यात ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी सांगितले.

ते म्हणाले की, २०३० पर्यंत देशाने २ ट्रिलियन डॉलरच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. मला खात्री आहे की आज भारताची सध्या असलेली ५० अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यात २०३० पर्यंत आमच्या निर्यातीत दुप्पट होऊन जवळपास १०० अब्ज अमेरिकन डॉलर्स होईल.

सचिव बर्थवाल हे येथे ‘इंड‌्सफूड शो २०२४’ मध्ये बोलत होते. हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा खाद्य आणि पेय शो आहे. सचिव म्हणाले की खाण्यासाठी तयार अन्न विभागासारख्या क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे. आयात करणाऱ्या देशांच्या तांत्रिक मानक आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही त्यांनी उद्योगांना केले.

शोचे उद्घाटन करताना वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, या आर्थिक वर्षात, तांदूळ, गहू आणि साखरेसह काही प्रमुख वस्तूंच्या शिपमेंटवर निर्बंध लादले गेले असले तरीही, देशाची कृषी निर्यात गेल्या वर्षीच्या ५३ अब्ज डॉलरच्या पातळीपेक्षा जास्त असेल. तत्पूर्वी, एका अधिकाऱ्याने सांगितले की, निर्यात बंदी आणि या वस्तूंवरील निर्बंधांमुळे या आर्थिक वर्षात सुमारे ४-५ अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यातीला फटका बसू शकतो. सरकारने गहू आणि बिगर बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे आणि साखर निर्यातीवरही निर्बंध लादले आहेत.

या कार्यक्रमात बोलताना ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला म्हणाले की, तीन दिवसीय शोमध्ये जगभरातून १,२०० हून अधिक प्रदर्शक आणि ७,५०० हून अधिक खरेदीदार सहभागी झाले आहेत. ग्रँड हायपरमार्केट, नेस्टो, मुस्तफा, एक्स ५, लुलू, अलमाया ग्रुप आणि स्पारसारख्या ८० हून अधिक रिटेल चेन देखील सहभागी होत आहेत, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in