नवी दिल्ली : येत्या आठवड्यात दिवाळीला सुरुवात होत असतानाच देशात प्रदूषणाचे प्रमाण भयानक वाढले आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
रविवारी सकाळी ११ शहरांतील वायू प्रदूषण निर्देशांक ३०० च्यावर गेला आहे. याचाच अर्थ या शहरांत प्रदूषणाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. भिवाडी, दिल्ली, नोएडा, मेरठ, गाझियाबाद, जयपूर, बुलंदशहर, अमृतसर, अलिगड, सोनीपत आणि फरिदाबाद आदी शहरांमध्ये प्रदूषण वाढले आहे. शेतकरी या काळात पराळी जाळतात. त्यामुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
राजस्थानच्या भिवाडीत ६१० (एक्यूआय) होता. तर दिल्लीच्या आनंद विहार भागात ४०० (एक्यूआय) होता. मुंबईच्या मरीन ड्राईव्हमध्ये प्रदूषण जाणवत होते. तर आग्रा येथे प्रदूषणामुळे ताजमहालचे दूरवरून दर्शन अस्पष्ट झाले होते.
दिल्लीत फटाक्यांवर बंदी
दिल्ली शहरात ‘दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती’ने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाके वाजवण्यावर बंदी घातली आहे. तसेच फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तसेच फटाक्यांची ऑनलाईन डिलिव्हरीही बंद केली आहे. त्यात हरित फटाक्यांचाही समावेश आहे. फटाक्यांच्या बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्लीतील १८ टक्के नागरिक फटाके वाजवण्याबाबत आग्रही
दिल्लीत सरकारने फटाके वाजवायला बंदी घातली असली तरीही दिल्लीतील १८ टक्के नागरिक यंदाच्या दिवाळीत फटाके वाजवण्यावर ठाम आहेत. एका सर्व्हेक्षण संस्थेने केलेल्या पाहणीत ५५ टक्के नागरिकांनी फटाके वाजवणार नसल्याचे सांगितले, तर १८ टक्के नागरिक फटाके वाजवण्याबाबत आग्रही आढळून आले आहेत. तर ९ टक्के नागरिकांनी आपण फटाके वाजवणारच, असा ठाम पवित्रा घेतला आहे. दिल्लीत यासाठी १०,५२६ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
‘एक्यूआय’ म्हणजे काय?
‘एक्यूआय’ हे प्रदूषण मोजण्याचे मोजमाप आहे. यात कार्बन डायऑक्साइड, ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड तपासला जातो. हवेत प्रदूषण जितके जास्त असेल तितकाच ‘एक्यूआय’चा स्तर जास्त असेल. २०० ते ३०० ‘एक्यूआय’ खराब समजला जातो. हवा प्रदूषित झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.