
लंडन : अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला त्याबद्दल केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. ‘अपघाताची घटना खूप दुर्दैवी आहे. ही घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ आहे आणि हा एक अपघात आहे असे दिसते. भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत’, असे वक्तव्य गोयल यांनी लंडनमधील ‘क्वीन एलिझाबेथ द्वितीय सेंटर’ येथे ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलताना केले.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. अपघात झाला तेव्हा विमानात २३० प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन पायलट होते. यातील एक प्रवासी वगळता इतर सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. यासोबतच हे विमान ज्या इमारतीवर कोसळले होते तेथील काहींचाही यामध्ये मृत्यू झाला. या अपघाताची सध्या चौकशी सुरू आहे, परंतु भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत. ही घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ आहे, अपघाताची चौकशी सुरू आहे, असे गोयल म्हणाले. या वादग्रस्त वक्तव्याची सध्या सर्व स्तरावर जोरदार चर्चा सुरू आहे.