Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताचं कारण काय? AAIB चा अहवाल सरकारकडे सादर

गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेशी संबंधित तपासाचा प्राथमिक तपास अहवाल मंगळवारी ‘विमान अपघात तपास ब्युरो’ने (एएआयबी) नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सोपवला.
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताचं कारण काय? AAIB चा अहवाल सरकारकडे सादर
पीटीआय
Published on

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेशी संबंधित तपासाचा प्राथमिक तपास अहवाल मंगळवारी ‘विमान अपघात तपास ब्युरो’ने (एएआयबी) नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सोपवला आहे.

या दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने ‘एएआयबी’ला या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले होते. ‘एएआयबी’ने २५ जूनपर्यंत ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्युलमधील डेटा प्राप्त केला होता. ब्लॅक बॉक्समधील डेटाची अचूकता तपासण्यासाठी ‘गोल्डन चेसिस’चा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, आज संसदेच्या लोक लेखा समितीची (पीएसी) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी होणार आहेत. या बैठकीत नागरी उड्डाण विभागाचे सचिव व नागरी विमान वाहतूक विभागाच्या महासंचालकांना (डीजीसीए) बोलावण्यात आले आहे. या बैठकीदरम्यान ‘एआय-१७१’ या विमानाच्या अपघाताव्यतिरिक्त विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा मानकांवर देखील चर्चा केली जाणार आहे.

या व्यापक तपास पथकात भारतीय वायुसेना, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, अमेरिकन नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, बोइंग, जीई, एव्हिएशन मेडिसिन तज्ज्ञ, एअर ट्रॅफिक कंट्रोलचे अधिकारी सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या ‘अ‍ॅनेक्स १३’ आणि भारताच्या विमान अपघात व दुर्घटना नियम २०१७ च्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या दुर्घटनेचा तपास केला जात आहे. सरकार व तपास पथकांचे ‘एएआयबी’च्या अंतिम अहवालाकडे लक्ष आहे. याद्वारे अपघाताचे मुख्य कारण समोर येईल. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे, मानवी त्रुटींमुळे की अन्य कुठल्या कारणाने हा अपघात झाला होता ते अंतिम अहवालातूनच स्पष्ट होईल.

एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाने १२ जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान जवळच्याच मेघानीनगर परिसरातील रहिवासी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील क्रू सदस्यांसह २४१ जण जागीच ठार झाले. तसेच ज्या रहिवासी भागात हे विमान कोसळले, तेथील २४ नागरिकही या अपघातात मृत्युमुखी पडले.

एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रीमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमाने सेवेत आहेत. एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर आपला जबाब सादर केले. या जबाबामध्ये एअर इंडियाने या अपघातातील विमान बोईंग-७८७-८ च्या दर्जाचा बचाव केला. तसेच हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक असल्याचे सांगितले. खरेतर विमानतळांवर अभिभार लावण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक कमालीची तणावपूर्ण झाली.

logo
marathi.freepressjournal.in