Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाकडून १६६ कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर

गेल्या महिन्यात झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन एअर इंडियाने दिले होते. त्यानुसार आता एअर इंडियाने आतापर्यंत १६६ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची अंतरिम भरपाई दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

अहमदाबाद : गेल्या महिन्यात झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन एअर इंडियाने दिले होते. त्यानुसार आता एअर इंडियाने आतापर्यंत १६६ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची अंतरिम भरपाई दिली आहे. उर्वरित ५२ मृतांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांनाही भरपाई लवकरच दिली जाईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

ही रक्कम पीडितांच्या तत्काळ आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल असे कंपनीने म्हटले आहे. या दुर्घटनेतील पीडितांच्या स्मरणार्थ आणि मदतीसाठी टाटा समूहाने ‘एआय-१७१ मेमोरियल अँड वेल्फेअर ट्रस्ट’ स्थापन केला आहे. या ट्रस्टने प्रत्येक मृतासाठी एक कोटी रुपयांची सानुग्रह मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, अपघातात नुकसान झालेल्या बी. जे. मेडिकल कॉलेज वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठीही हा ट्रस्ट मदत करणार आहे. या ट्रस्टद्वारे प्रथमोपचार देणारे, वैद्यकीय आणि आपत्कालीन मदत व्यावसायिक, समाजसेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानसिक त्रासावर उपचार आणि मदतीसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जाईल. ही तात्पुरती भरपाई अंतिम नुकसानभरपाईतून समायोजित केली जाईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.

अहमदाबाद विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) या घटनेची सखोल चौकशी करत आहे. प्राथमिक अहवालात विमानातील इंधन स्विच लॉक आणि थ्रस्ट फेल्युअर यांसारख्या तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या अपघातामुळे विमान सुरक्षा आणि देखरेखीच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण सुरू असून, अंतिम अहवाल लवकरच अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in