Ahmedabad Plane Crash : दोन्ही इंजिनात बिघाड किंवा पक्ष्यांच्या धडकेमुळे अपघात; तज्ज्ञांचा अंदाज

दोन्ही इंजिनात बिघाड अथवा पक्षांची धडक यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज तीन ज्येष्ठ वैमानिकांनी व्यक्त केला आहे.
Ahmedabad Plane Crash : दोन्ही इंजिनात बिघाड किंवा पक्ष्यांच्या धडकेमुळे अपघात; तज्ज्ञांचा अंदाज
Published on

अहमदाबाद : दोन्ही इंजिनात बिघाड अथवा पक्षांची धडक यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज तीन ज्येष्ठ वैमानिकांनी व्यक्त केला आहे.

या वैमानिकांनी सांगितले की, या विमानाच्या अपघाताचे व्हिडीओ पाहता विमानाने उड्डाण केल्यानंतर इंजिनाकडून जी ताकद मिळायला हवी होती, ती मिळाली नाही, असे दिसते. त्यामुळेच निवासी भागात हे विमान कोसळले.

या अपघाताचा तपशीलवार तपास हवाई अपघात तपास यंत्रणेकडून (एएआयबी) झाल्यानंतर याचे खरे कारण कळू शकेल.

विमान कोसळतानाच्या उपलब्ध दृश्यांच्या आधारे तज्ज्ञांनी संभाव्य कारणे सांगितली. एका कमांडरने सांगितले की, विमानाच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे दिसत नाही, कारण अशा परिस्थितीत विमान हलत असेल पण येथे विमान स्थिर होते. पण, या विमानाची दोन्ही इंजिने खराब झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे इंजिनांना ताकद मिळू शकली नाही. छायाचित्रांवरून असे दिसते की उड्डाणाच्या वेळी फ्लॅप्स वर होते किंवा लँडिंग गियर खाली होते, असे हा कमांडर म्हणाला.

तर दुसऱ्या कमांडरने सांगितले की, दोन्ही इंजिनांना ताकद न मिळाल्याने विमान कोसळले असावे. जर पक्षी धडकल्याने दोन्ही इंजिनमध्ये आग लागली असती तर हे घडू शकते," असेही तो म्हणाला. तिसरा कमांडर म्हणाला की, विमानाच्या दोन्ही इंजिनची शक्ती गेली असावी. एका इंजिनमध्ये बिघाड झाला असावा आणि कदाचित उड्डाणानंतर लँडिंग गियर मागे न घेतल्यामुळे, दुसऱ्या इंजिनमध्ये पुरेशी शक्ती नसावी. तसेच विमानात मर्यादेपेक्षा अधिक वजन झाले असावे. या परिस्थितीत विमानाचे उड्डाण शक्य होत नाही. ‘डीजीसीए’ने सांगितले की, विमानाने उड्डाण केल्यानंतर वैमानिकाने तत्काळ हवाई नियंत्रण कक्षाला इशारा दिला होता. त्यानंतर हवाई नियंत्रण कक्षाने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.

logo
marathi.freepressjournal.in