
अहमदाबाद : अहमदाबादहून लंडन गॅटविक्सला जाणारे विमान काही क्षणात कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात तब्बल २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या मते, आतापर्यंत १६२ मृतदेहांचे डीएनए जुळले आहेत. तसेच आतापर्यंत १२० मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत.
"या अपघातात अनेक मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे डीएनए चाचण्या जुळवण्यात अडचणी येत आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १६२ मृतांचे डीएनए जुळवण्यात यश आले असून त्यापैकी १२० मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेह लवकरच त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येतील," असे गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले.
अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक राकेश जोशी म्हणाले की, "मंगळवारी रात्री किंवा बुधवार सकाळपर्यंत सर्व मृतांच्या नातेवाईकांच्या डीएनएचे नमुने घेण्याचे काम पूर्ण होणार आहे." या अपघाताचा तपास आता 'एएआयबी' म्हणजेच 'विमान अपघात तपास ब्युरो', राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), ब्रिटनची हवाई अपघात तपास शाखा (एएआयबी, यूके), अमेरिकन फेडरल एव्हिएशन एजन्सी (एफएए), बोईंग कंपनी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) करत आहेत.
घटनास्थळावरून ८० तोळे सोने, ८० हजार रोख, पासपोर्ट सापडले
मेघानीनगर परिसरात झालेल्या या अपघातस्थळावरून ८० तोळे सोने, ८० हजार रुपये रोख, एक मोबाइल फोन, भगवद्गीतेची प्रत, ९ पासपोर्ट आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ४ ते ५ बॅगा सापडल्या आहेत. घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंची कागदपत्रे तयार केली जात असून हे सामान मृतांच्या कुटुंबीयांना परत केले जाईल, असे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले.