

अहमदाबाद: येथे ‘एआय-१७१’ या एअर इंडियाच्या विमानाला १२ जून २०२५ रोजी झालेला अपघात हा आपल्या आयुष्यातील सर्वात दु:खदायक प्रसंग आहे, असे गुजरातचे पोलीस महासंचालक ज्ञानेंद्र सिंह मलिक यांनी सांगितले.
एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या वर्षपूर्तीनिमित्त ते म्हणाले की, ही दुर्घटना त्यांच्या स्मरणात केवळ त्याच्या भीषणतेमुळेच नाही, तर ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या होरपळलेल्या मृतदेहांच्या विदारक दृश्यांमुळे कायमची कोरली गेली आहे.
अपघातानंतर समन्वयाची प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली आणि यात सामील असलेल्या प्रत्येकाचे समन्वय आणि सहकार्य उत्कृष्ट होते. तरीही, माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील ही सर्वात वेदनादायक घटना आहे.
दुःखाच्या वातावरणातही मलिक यांनी आपत्कालीन यंत्रणेने दाखवलेल्या विलक्षण वेग आणि अचूकतेचे कौतुक केले. अपघातानंतर राबवण्यात आलेली डीएनए मॅचिंग प्रणाली ही कदाचित जगभरात राबवलेल्या सर्वात जलद ओळख पटवण्याच्या मोहिमांपैकी एक ठरली, असे मलिक यांनी सांगितले.
आपत्कालीन यंत्रणेची तत्परता आणि शिस्त
अपघातानंतर ३० मिनिटांत ५०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिकांसाठी तात्काळ ‘खास मार्गिका’ तयार केली. तर सुरक्षा व्यवस्थाही झपाट्याने कडक करण्यात आली.
मृतांच्या नातेवाईकांना विमा किंवा कायदेशीर सोपस्कारांसाठी पुन्हा फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी शवविच्छेदन अहवाल, डीएनए रिपोर्ट, एफआयआरची प्रत आणि पंचनामा आदी सर्व महत्त्वाची कागदपत्रे थेट घटनास्थळीच देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
लंडनला जाणारे एअर इंडियाचे ‘एआय-१७१’ हे विमान गेल्या वर्षी १२ जून रोजी दुपारी १.४१ वाजता अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले होते. या अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि कर्मचारी दल, तसेच जवळच असलेल्या वैद्यकीय केंद्रातील लोकांसह जमिनीवरील १९ व्यक्ती अशा एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता.
त्यावेळी अहमदाबादचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मलिक यांनी सांगितले की, मृतदेहांची अचूक ओळख पटवून ते लवकरात लवकर नातेवाईकांच्या स्वाधीन करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते आणि हे काम अतिशय वेगाने करण्यात आले. डीएनए ओळखीची संपूर्ण प्रक्रिया आणि मृतदेह सुपूर्द करण्याचा वेग उल्लेखनीय होता.
जलद डीएनए नमूने गोळा
दुपारी १.४१ वाजता अपघात झाला आणि त्याच दिवशी रात्री ८.३० वाजेपर्यंत ५१ नातेवाईकांचे नमुने अहमदाबाद डीएनए केंद्रात जमा करण्यात आले होते. तर १३ जून, रात्री १२.१९ वाजता अपघातानंतर ११ तासांपेक्षा कमी वेळात, जळालेल्या मृतदेहांचे पहिले डीएनए नमुने गांधीनगरला पाठवले. तसेच मृतदेहही विक्रमी वेळेत त्यांच्या नातेवाईकांना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोपवण्यात आले. नातेवाईकांना विमा दावा आणि इतर कामांसाठी पुन्हा कार्यालयात यावे लागू नये, म्हणून सर्व कागदपत्रे जागच्या जागी देणे हा एक ऐतिहासिक आणि संवेदनशिल निर्णय ठरला, असे मलिक यांनी स्पष्ट केले.
आज दोन मिनिटांचे मौन
गेल्यावर्षी अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एअर इंडियाचे कर्मचारी शुक्रवारी आपापल्या कामाच्या ठिकाणी दोन मिनिटांचे मौन पाळणार आहेत. हे दोन मिनिटांचे मौन दुपारी १:३९ ते १:४१ या वेळेत पाळले जाईल, असे कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना कळवले आहे.