Ahmedabad Plane Crash: काळ आला, पण वेळ आली नव्हती! १० मिनिटे उशीर झाल्याने भूमी चौहान थोडक्यात बचावल्या

वाहतूककोंडीमुळे विमान पकडण्यासाठी १० मिनिटे उशीर झाला आणि गणपती बाप्पा पावला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Ahmedabad Plane Crash: काळ आला, पण वेळ आली नव्हती! १० मिनिटे उशीर झाल्याने भूमी चौहान थोडक्यात बचावल्या
Published on

अहमदाबाद : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या जगात प्रवास करताना ट्रेन, बस अथवा विमान पकडण्यासाठी अगदी काही जण जीवाचा आकांत करत असतात. पण जीवाचे रान करूनही अनेकदा काही क्षणाकरिता आपल्याला वेळेत पोहोचता येत नाही, त्यावेळी मनाला रूखरूख लागलेली असते. पण काही वेळेला झालेला उशीरही तितकाच फायदेशीर ठरतो, याचा प्रत्यय भूमी चौहान यांनी गुरुवारी अनुभवला.

भूमी चौहान या अहमदाबाद येथून लंडनला जाणारे विमान पकडण्यासाठी विमानतळावर दाखल झाल्या. मात्र १० मिनिटे उशीर झाल्यामुळे विमानाने आधीच उड्डाण केले होते. त्यामुळे त्यांना विमानतळावरून निराशेनेच घरी परतावे लागले. पण विमानाने हवेत भरारी घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच ते कोसळल्याची बातमी ऐकून भूमी यांच्याही काळजात अगदी धस्स झाले. वाहतूककोंडीमुळे उशीर झाला नसता आणि पुढच्या आयुष्याची स्वप्ने कवेत घेऊन त्यांनीही विमानातून उड्डाण केले असते तर कदाचित त्यांच्या आयुष्याची, स्वप्नांची राखरांगोळी झाली असती. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला.

भूमी चौहान आपली सुट्टी आटोपून लंडनसाठी निघाल्या होत्या. निघताना त्यांचे पतीसोबत बोलणेही झाले होते. वेळेत विमान पकडण्यासाठी निघालेल्या भूमी यांचा जीव वाहतूककोंडीमुळे अक्षरश: गुदमरला होता. पण परमेश्वराच्याच मनात असल्यामुळे त्यांना वाहतूककोंडीमुळे विमान पकडण्यासाठी १० मिनिटे उशीर झाला आणि गणपती बाप्पा पावला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या की, “अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या विमानातूनच मी प्रवास करणार होते. सुट्टी आटोपून लंडनला निघताना मला वाहतूककोंडीमुळे उशीर झाला. विमान वेळेत निघाले होते, पण मला १० मिनिटे विलंब झाल्यामुळे विमानात बसता आले नाही.

logo
marathi.freepressjournal.in