

राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये सादर करण्यात आलेल्या एका रोबोटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रेटर नोएडा येथील 'गलगोटिया विद्यापीठा'च्या (Galgotias University) वतीने सादर करण्यात आलेला चार पायांचा रोबोटिक डॉग हा विद्यापीठानेच विकसित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तो प्रत्यक्षात चीनमध्ये तयार होणारे व्यावसायिक उत्पादन असल्याचे समोर आल्यानंतर टीकेचा भडीमार होत आहे. भारताच्या विद्यापीठाने चिनी रोबोट स्वतःचा म्हणून सादर केल्याचे म्हणत चीनमधील नेटकरीही यावरून चांगलीच खिल्ली उडवत आहेत.
तात्काळ एक्स्पो स्थळ सोडा, वीज पुरवठाही केला बंद
ताज्या माहितीनुसार, 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'च्या आयोजकांनी दाव्यांमधील तफावत आणि सोशल मीडियावरील वाढत्या गोंधळाचे कारण देत विद्यापीठाला तात्काळ एक्स्पो स्थळ रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजकांनी गलगोटिया विद्यापीठाला आपला प्रदर्शन स्टॉल तातडीने रिकामा करण्यास सांगितले आहे. गलगोटिया विद्यापीठाच्या मंडपातील वीज देखील खंडित करण्यात आली आहे. आयोजकांना अजून वाद आणि गोंधळ वाढवायचा नसल्याने विद्यापीठाला त्यांचे प्रदर्शन तात्काळ थांबवण्यास आणि ठिकाण रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेसाठी, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून हकालपट्टी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
वादाची सुरूवात कशी?
भारत मंडपम येथे आयोजित समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक नेहा सिंग यांनी ‘ओरायन’ (Orion) नावाचा रोबोटिक डॉग सादर केला. त्यांनी हा रोबोट गलगोटिया विद्यापीठाच्या “सेंटर ऑफ एक्सलन्स”मध्ये विकसित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कठीण भूभागावर देखरेखीसाठी हा प्रगत तंत्रज्ञानाचा रोबोट तयार केल्याचे त्या म्हणाल्या. त्यांची ही व्हिडिओ मुलाखत व्हायरल झाली.
सोशल मीडिया आणि फॅक्ट-चेकनंतर नाचक्की
नेहा सिंग यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी संबंधित रोबोट हा चीनमधील ‘युनिट्री रोबोटिक्स’ (Unitree Robotics) कंपनीचा ‘युनिट्री Go2’ ( Unitree Go2) मॉडेल असल्याचे ओळखले. हा रोबोट बाजारात सुमारे २.५ लाख रुपयांना उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे, सादरीकरणावेळी रोबोटवर मूळ कंपनीचे चिन्ह स्पष्टपणे दिसत असल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
विद्यापीठ म्हणते - आमच्याबाबत नकारात्मक प्रचार
वाद वाढल्यानंतर गलगोटिया विद्यापीठाने अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केले की, त्यांनी हा रोबोट स्वतः विकसित केल्याचा दावा कधीच केला नाही. विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हा रोबोट खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “नवोन्मेषाला सीमा नसतात,” असे म्हणत विद्यापीठ प्रशासनाने हा वाद नकारात्मक प्रचार असल्याचेही म्हटले. मात्र, सोशल मीडियावर नेहा सिंग यांच्या सादरीकरणाचा व्हिडिओ वारंवार शेअर केला जात आहे. ज्यात त्या स्पष्टपणे रोबोट विद्यापीठाने बनवल्याचा दावा करताना दिसतात.