AI इम्पॅक्ट जाहीरनाम्यावर ८८ देशांचे शिक्कामोर्तब

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयक जागतिक सहकार्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ‘नवी दिल्ली एआय इम्पॅक्ट जाहीरनाम्या’ला अमेरिका, ब्रिटन, चीन आणि फ्रान्ससह ८८ देश व आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती अधिकृत निवेदनात शनिवारी देण्यात आली.
AI इम्पॅक्ट जाहीरनाम्यावर ८८ देशांचे शिक्कामोर्तब
AI इम्पॅक्ट जाहीरनाम्यावर ८८ देशांचे शिक्कामोर्तबPhoto : PTI
Published on

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयक जागतिक सहकार्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ‘नवी दिल्ली एआय इम्पॅक्ट जाहीरनाम्या’ला अमेरिका, ब्रिटन, चीन आणि फ्रान्ससह ८८ देश व आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती अधिकृत निवेदनात शनिवारी देण्यात आली.

‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या तत्त्वावर आधारित असलेल्या या जाहीरनाम्यात एआयचे लाभ संपूर्ण मानवजातीमध्ये न्याय्य पद्धतीने वाटले गेले पाहिजेत, यावर भर देण्यात आला आहे.

या जाहीरनाम्यात आंतरराष्ट्रीय सहकार्य व बहु-हितधारक सहभाग बळकट करण्यावर, राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा सन्मान राखण्यावर तसेच सुलभ आणि विश्वासार्ह चौकटींमधून एआयचा विकास पुढे नेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

जागतिक एआय सहकार्याचा पाया ठरणाऱ्या सात प्रमुख स्तंभांवर हा जाहीरनामा आधारित आहे. त्यामध्ये एआय संसाधनांचे लोकशाहीकरण, आर्थिक विकास व सामाजिक हित, सुरक्षित व विश्वासार्ह एआय, विज्ञानासाठी एआय, सामाजिक सशक्तीकरणासाठी प्रवेश, मानवी भांडवल विकास तसेच सक्षम, कार्यक्षम आणि नावीन्यपूर्ण एआय प्रणाली यांचा समावेश आहे.

‘१८–१९ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत झालेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चा समारोप ‘नवी दिल्ली एआय इम्पॅक्ट जाहीरनामा’ स्वीकारून झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील जागतिक सहकार्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ८८ देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी या जाहीरनाम्याला पाठिंबा दिला असून, आर्थिक विकास आणि सामाजिक हितासाठी एआयचा उपयोग करण्याबाबत व्यापक जागतिक सहमती दिसून येते.

या जाहीरनाम्याला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, भूतान, ब्राझील, कॅनडा, डेन्मार्क, एस्टोनिया, इथिओपिया, जपान, इटली, इस्रायल, आयर्लंड आदींचा समावेश आहे.

याशिवाय इंडोनेशिया, इराण, हंगेरी, ग्रीस, जर्मनी, फिनलंड, मेक्सिको, म्यानमार, नेपाळ, नेदरलँड्स, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, टांझानिया, संयुक्त अरब अमिराती, युक्रेन, युरोपियन युनियन (ईयू) आणि आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी यांचाही समावेश आहे.

या परिषदेमुळे दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय भागीदारींना चालना मिळेल आणि एआयला आर्थिक विकासाचा एक प्रमुख चालक म्हणून स्थान मिळेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

या समिटमध्ये अनेक ऐच्छिक आणि सहकार्यात्मक जागतिक उपक्रम सादर केले. त्यात ‘डेमोक्रॅटिक डिफ्यूजन ऑफ एआय’ चार्टरचा समावेश असून, तो मूलभूत एआय संसाधनांपर्यंत परवडणारा प्रवेश उपलब्ध करून देण्यास आणि स्थानिक गरजांनुसार नवोन्मेष परिसंस्थांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करतो.

याशिवाय ‘ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्स’ या व्यासपीठावर जागतिक पातळीवर एआय वापर प्रकरणे विस्तारण्यासाठी व पुनरुत्पादित करण्यावर भर देण्यात आला आहे, तसेच विकासात्मक परिणामांसाठी देशांदरम्यान सहकार्य सक्षम करण्याचा उद्देश आहे. ‘ट्रस्टेड एआय कॉमन्स’ अंतर्गत साधने, मानके आणि सर्वोत्तम पद्धतींचा संग्रह तयार करून सुरक्षित व विश्वासार्ह एआय प्रणालींच्या विकासाला पाठिंबा दिला जाणार आहे.

महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये एआय कार्यबल विकास मार्गदर्शक आणि पुनःकौशल्य तत्त्वांचा समावेश आहे, जे कौशल्यविकास, पुनःकौशल्य आणि एआय साक्षरतेला पाठबळ देतील व देशांना एआय-आधारित अर्थव्यवस्थेसाठी तयार करतील. तसेच सक्षम व कार्यक्षम एआय प्रणालींसाठी मार्गदर्शक तत्त्वे मांडण्यात आली असून, ऊर्जा-कार्यक्षम एआय पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

या जाहीरनाम्यात आर्थिक परिवर्तनासाठी एआयची भूमिका, मुक्त-स्रोत आणि सुलभ एआय परिसंस्थांचे महत्त्व, ऊर्जा-कार्यक्षम एआय पायाभूत सुविधांची गरज तसेच विज्ञान, प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरणामध्ये एआयची वाढती भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय संस्थांचे जाळे उभारणार

विज्ञानासाठी एआय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय संस्थांचे जाळे उभारण्याचीही तरतूद असून, त्यातून जागतिक वैज्ञानिक सहकार्य सुलभ होईल आणि एआय-आधारित संशोधन क्षमतांना चालना मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in