‘एआय’मुळे शेती क्षेत्रात मोठे बदल; महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांची माहिती

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने परिवर्तन घडवत असून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन निर्णयांपासून उत्पादनवाढीपर्यंत ठोस परिणाम दिसून येत आहेत, असे महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी मंगळवारी सांगितले.
‘एआय’मुळे शेती क्षेत्रात मोठे बदल; महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांची माहिती
‘एआय’मुळे शेती क्षेत्रात मोठे बदल; महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांची माहिती
Published on

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने परिवर्तन घडवत असून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन निर्णयांपासून उत्पादनवाढीपर्यंत ठोस परिणाम दिसून येत आहेत, असे महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी मंगळवारी सांगितले.

येथे आयोजित जागतिक ‘एआय’ परिषदेत २६ नाविन्यपूर्ण अभ्यासांचा संग्रह प्रकाशित करताना त्या बोलत होत्या.

काश्मीरमध्ये गायींसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट नेकलेस’द्वारे आजाराची लक्षणे दिसण्याच्या काही दिवस आधीच संसर्ग ओळखला जातो, तर उपग्रहांच्या मदतीने ऊसातील साखरेचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत अचूकतेने भाकीत केले जाते, अशी उदाहरणे देत विमला म्हणाल्या की एआयमुळे लाखो लघु व सीमांत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे.

महाराष्ट्राच्या कृषी विभागाने मे २०२५ मध्ये विकसित केलेल्या ‘महाविस्तार-एआय’ या संवादात्मक प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत २२ लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक पीक सल्ले देण्यात आले आहेत. ‘हे केवळ बदल नाही, तर मोठ्या प्रमाणावर झालेले रूपांतर आहे,’ असे विमला यांनी ‘एआय केसबुक ऑन जेंडर अँड अ‍ॅग्रीकल्चर’च्या प्रकाशनावेळी नमूद केले.

माती परीक्षणाबाबत ‘वसुधा’ आणि ‘निओ पार्क’ कार्यक्रमांतर्गत वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल उपकरणांमध्ये हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून जागेवरच मातीचा संपूर्ण रासायनिक प्रोफाइल ९० टक्क्यांहून अधिक अचूकतेने मिळत आहे. त्यामुळे आठवड्यांची प्रयोगशाळा प्रतीक्षा टळत असून, उपग्रह डेटासोबत एकत्रित वापरामुळे शेतकऱ्यांना २० ते ३२ टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ अनुभवायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या संग्रहात ‘मॅपक्रॉप’ कंपनीने सुपर-रेझोल्यूशन उपग्रह प्रतिमांच्या आधारे उसातील सुक्रोज पातळी ९५ टक्के अचूकतेने भाकीत केल्याची नोंद आहे. यामुळे ५७ टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ साध्य झाली आहे. हाच उपग्रह पायाभूत ढाचा शेतकऱ्यांचे क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी वापरला जात आहे.

‘एआय’ प्रत्येक शेतकऱ्यासाठी

‘एआय ही केवळ काही मोजक्या लोकांसाठी नसून, ग्लोबल साऊथमधील प्रत्येक कोपऱ्यातील शेतकऱ्यासाठी आहे. शेतीचे भविष्य केवळ १० अब्ज लोकांना अन्न देण्यापुरते मर्यादित नाही; ते न्याय्य, शाश्वत आणि सन्मानाने करण्याबाबत आहे, असे विमला यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in