नवी दिल्ली : पारंपरिक शवविच्छेदनात मोठी कापाकापी करावी लागते, तसेच टाके घालावे लागतात. त्यामुळे संबंधित मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना मानसिक यातना होत असतात. त्यामुळे आभासी शवविच्छेदनाचा नवीन पर्याय तयार झाला आहे. त्याची मार्गदर्शक तत्त्वे दिल्लीतील 'एम्स'कडून तयार झाली आहेत.
'एम्स'मध्ये रेडक्रॉस सोसायटी व न्यायवैज्ञक क्षेत्रातील तज्ज्ञांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत 'एम्स'ने आपल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर केले. ९२ टक्के कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना पारंपरिक शवविच्छेदन नको. कारण आम्हाला मानसिक यातना होतात. एम्सच्या न्यायवैज्ञक औषधशास्त्राचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या भावना व तांत्रिक गरजा लक्षात घेऊन 'एम्स'ने आभासी शवविच्छेदनाचा नवीन पर्याय तयार केला आहे. या तंत्रात सीटीस्कॅन, २डी/३डी इमेजिंग व डिजिटल अॅनालिसिस यांच्या मदतीने मृतदेह न उघडताच अंतर्गत अवयव, हाडे, जखमांचा तपास केला जातो. अनेक बाबतींत आभासी शवविच्छेदन हे पारंपरिक शवविच्छेदनाची जागा घेऊ शकते. कारण नवीन तंत्रज्ञान वैद्यक-कायदेशीर सत्य अत्यंत अचूकपणे समोर आणू शकते. आभासी शवविच्छेदन हे मृतदेहाच्या वयापासून गळ्यातील अंतर्गत जखमांची तपासणी करू शकते.
'एम्स'मध्ये पहिले आभासी शवविच्छेदन केंद्र
न्यायवैज्ञक वैद्यकीय विभागाने आयसीएमआरला याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर 'एम्स'मध्ये आभासी केंद्र तयार केले. हे केंद्र जगातील कोणत्याही आभासी केंद्राच्या तोडीस तोड आहे. विकसित देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरणे सुरू झाले आहे. आता भारतही या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे.
एम्सची मार्गदर्शक तत्त्वे
गेल्या काही वर्षांत स्फोट किंवा अन्य घटनांमध्ये शरीराची ओळख पटू शकत नाही. तेव्हा हे आव्हान स्वीकारून 'एम्स'ने एक विशेष पुनर्बाधणी शिष्टाचार तयार करायला सुरुवात केली. त्यामुळे कुटुंबीयांना मृतदेह चांगल्या अवस्थेत मिळू शकेल. स्फोट झाल्यानंतर शरीराचे अनेक भाग ठिकठिकाणी पडलेले आढळतात. प्रत्येक अवयव सावधपणे उचलणे, त्याची ओळख पटवून देणे, डीएनए जोडून देणे यानंतर योग्य पद्धतीने मृतदेहाची पुनर्बाधणी करणे हे मोठे आव्हान असते. या प्रकरणांमध्ये शरीरातील सर्व अवयव एकाच रुग्णालयात घेऊन जावेत. त्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी येऊ नयेत.
राष्ट्रीय शवागार उभारण्याचे काम सुरू
डॉ. सुधीर म्हणाले की, विमान कोसळणे, रेल्वे अपघात किंवा स्फोटात मोठ्या प्रमाणावर शव मिळतात. त्यामुळे राष्ट्रीय शवागार उभारण्याचे काम सुरू झाले आहे. जेथे ४०० ते ५०० शव सुरक्षित राहू शकतात.
ऑस्ट्रेलियासारख्या देशात या सुविधा पहिल्यापासूनच अस्तित्वात आहेत. याबाबत आम्ही गृह खात्याला प्रस्ताव पाठवला आहे. हे शवागार उभे राहिल्यास मृतदेहाची ओळख, जतन, डीएनए नमुने मिळवणे सोपे बनेल. देशाच्या कोणत्याही भागात दोन ते अडीच तासांत मृतदेह नेला जाऊ शकेल. कारण घटनास्थळावरून मृतदेह हटवणे गरजेचे असते.