
एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्लीतील घरावर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटकरत माहिती दिली असून रविवारी १९ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की, "दिल्लीतील माझ्या घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. २०१४ पासून ही चौथी घटना आहे. रविवारी संध्याकाळी मी जयपूरहून परतल्यानंतर मला दिल्लीतील सहकाऱ्यांनी ही माहिती दिली. या दगडफेकीत खिडकीची काच फुटली असून मला चिंता वाटते कारण हा प्रकार कथित उच्च सुरक्षा असलेल्या विभागामध्ये घडला आहे. याबद्दल मी पोलिसांकडे तक्रार केली आहे." अशी माहिती त्यांनी दिली. यावरून, दिल्ली पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेऊ, असे आश्वासन दिले आहे.