
अहमदाबाद : लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची ‘एनआयए’सह चार तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली असून शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या छपरावरून विमानाचा ब्लॅक बॉक्स (डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर) ताब्यात घेण्यात आला. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताचे कारण शोधण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताचा आढावा घेतला व जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर (एआय १७१) विमानात एकूण २४२ प्रवासी व कर्मचारी होते, त्यातील फक्त एक जण वाचला आहे. याशिवाय, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहामधील २४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये पाच ‘एमबीबीए’च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच कोसळले आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या आवारात आदळल्यानंतर जळून खाक झाले.
‘एएआयबी’च्या निवेदनानुसार, विमानाचा ब्लॅक बॉक्स (डीएफडीआर) बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या छतावर सापडला, जिथे विमानाचा शेपटीचा भाग अडकलेला होता. ‘डीएफडीआर’ सामान्यतः विमानाच्या शेपटीच्या भागात असतो आणि तो सहज सापडावा म्हणून तो संत्री रंगात रंगवलेला असतो.
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी सांगितले की, अपघातानंतर २८ तासांच्या आत ‘डीएफडीआर’ जप्त करण्यात आला आहे. ही तपासाच्या दृष्टीने एक मोठी प्रगती आहे.
‘सीव्हीआर’ अद्याप सापडलेला नाही
‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’बद्दल (सीव्हीआर) मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा रेकॉर्डर वैमानिकांमधील संभाषण, इंजिनचा आवाज व इतर रेडिओ संवाद रेकॉर्ड करतो.
सहा मृतदेहांची ओळख पटली
चेहरा ओळखता येण्याजोगा असलेल्या सहा मृतदेहांची ओळख पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरितांचे ‘डीएनए’ नमुने घेऊन ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. २१५ मृतांचे नातेवाईक नमुने देण्यासाठी पुढे आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ‘डीएनए’चा तपास पूर्ण होण्यासाठी ७२ तास लागणार असून, त्यात जुळणाऱ्या ‘डीएनए’नुसार संबंधित प्रवाशांचे मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द केले जातील.
अपघाताचा तपास सुरू
राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी घटनास्थळी गेले होते व त्यांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाने (एनटीएसबी) गुरुवारी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, ते ‘एएआयबी’ला तपासात मदत करण्यासाठी अमेरिकन तज्ज्ञांची टीम भारतात पाठवणार आहेत.” ‘एनटीएसबी’ ही अमेरिकेतील नागरी विमान अपघातांचा तपास करणारी सरकारी संस्था आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटताच राजकोटमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचा मुलगा उद्या अमेरिकेहून परत येईल.
अपघातात ४ वैद्यकीय विद्यार्थी व एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू
गुजरात ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. मेहुल शाह म्हणाले की, अपघातात ४ वैद्यकीय विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर ४५ हून अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृहातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. १०० हून अधिक डॉक्टर मदतकार्यात गुंतले आहेत.
पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अपघातस्थळाला भेट दिली व अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मोदींनी अहमदाबाद विमानतळाजवळील गुजरसाईल कार्यालयात नागरी व राज्य अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मोदींनी या अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार यांची भेट घेऊन अपघात कसा झाला याची माहिती घेतली. यावेली रमेश यांनी ‘मी कसा वाचलो हेच कळत नाही’, असे पंतप्रधानांना सांगितले. रमेश हे ब्रिटनमधील लेस्टर येथील उद्योजक असून, ते मूळचे दीवचे रहिवासी आहेत. रमेश हे आपत्तीग्रस्त विमानातील डाव्या बाजूच्या ‘११ए’ सीटवर बसले होते, जी एका आपत्कालीन दरवाजाजवळ होती. तेथेच त्यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचा "विनम्र व मेहनती" नेता म्हणून उल्लेख केला.
प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानांची कसून तपासणी करा : ‘डीजीसीए’चे आदेश
नवी दिल्ली : ‘डीजीसीए’ने एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ‘ड्रीमलायनर’ ताफ्याच्या कसून तपासणीचे आदेश दिले आहेत. तसेच बोईंगच्या ‘७८७-८’ व बोइंग ‘७८७-९’ या विमानांची प्रत्येक उड्डाणापूर्वी कसून तपासणी करावी. या तपासणीचा अहवाल ‘डीजीसीए’ला पाठवावा, असे निर्देश दिले आहेत.
१२ जून रोजी अहमदाबाद-लंडन विमान अपघातानंतर ‘डीजीसीए’ने हे आदेश जारी केले आहेत. तसेच एअर इंडियाला ‘जेनएक्स’ इंजिन असलेल्या बोईंग ७८७-८ व ७८७-९ या विमानांची अतिरिक्त देखभाल करण्यास सांगितले. हे आदेश १५ जूनपासून लागू होतील. एअर इंडियाच्या ताफ्यात २६ बोइंग ७८७-८ आणि ७ बोईंग ७८७-९ विमाने आहेत.
प्रत्येक उड्डाणापूर्व खालील बाबी तपासणार
इंधन यंत्रणेची तपासणी, केबिनमध्ये हवा पोहचवणारी यंत्रणा, इंजिन नियंत्रण यंत्रणेची तपासणी, इंजिनात इंधन टाकणे व तेल यंत्रणेची तपासणी. हायड्रोलिक सिस्टमची तपासणी, ब्रेक नियंत्रण, उड्डाण करताना वेगाचे आकडे, वजनाची चाचणी, विमानाच्या इंजिनाच्या ताकदीची तपासणी, १५ दिवसांत विमानात जे बिघाड सातत्याने झाले त्याची तपासणी पूर्ण झाल्याशिवाय देखभाल बंद होणार नाही.
एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग
बँकॉक : थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमान ‘एआय-३७९ चे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने ते तातडीने उतरवण्यात आले. या विमानात १५६ प्रवासी होते. हे विमान फुकेतहून दिल्लीला येत होते. एअर इंडियाच्या विमानाने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता फुकेत विमानतळावरून उड्डाण केले. विमान अंदमान समुद्रावर एक मोठे वर्तुळ करत फिरले आणि नंतर फुकेतमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. थायलंडने सांगितले की, बॉम्बची धमकी मिळताच फुकेत विमानतळाने विमानतळ आकस्मिकता योजना (एसीपी) सक्रिय केली.