दिवस विमान बिघाडांचा

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अलीकडच्या काळात विमान बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोमवारचा दिवस विमान बिघाडांचा दिवस ठरला. या एकाच दिवशी बिघाड वा धमक्यांमुळे जगभरात चार विमानांचे ‘इमर्जन्सी लँडिंग’ करावे लागले.
दिवस विमान बिघाडांचा
Photo - GQ
Published on

नवी दिल्ली : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अलीकडच्या काळात विमान बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोमवारचा दिवस विमान बिघाडांचा दिवस ठरला. या एकाच दिवशी बिघाड वा धमक्यांमुळे जगभरात चार विमानांचे ‘इमर्जन्सी लँडिंग’ करावे लागले.

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड

मुंबई : हाँगकॉँगहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट ‘एआय-३१५’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते उड्डाणानंतर अवघ्या एका तासात पुन्हा हाँगकाँग येथे वळवावे लागल्याची घटना सोमवारी घडली.

बिघाड झालेले विमान हे बोईंग कंपनीचे ‘७८७-८ ड्रीमलायनर’ विमानच आहे. विमान सुखरूपपणे हाँगकाँग विमानतळावर उतरविण्यात आले असून सर्व प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले. या विमानाची कसून तपासणी केली जात आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, ‘फ्लाइट एआय ३१५’बाबत एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘एआय-३१५’ सुरक्षितपणे हाँगकाँग विमानतळावर उतरवण्यात आले असून विमानाची तपासणी केली जात आहे. विमानाने हाँगकाँगवरून स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.१६ वाजता उड्डाण केले होते. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.२० वाजता हे विमान दिल्ली विमानतळावर उतरणार होते.

ब्रिटिश एअरवेजने केले ‘इमर्जन्सी लँडिंग’

लंडन : हिथ्रो विमानतळावरून चेन्नईच्या दिशेने उड्डाण केलेले बोईंग कंपनीने विमान पुन्हा हिथ्रो विमानतळावर तातडीने उतरवावे लागल्याची घटना घडली आहे.

स्थानिक प्रमाणवेळेनुसार रविवारी दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी हिथ्रो विमानतळावरून ब्रिटिश एअरवेजच्या बीए ३५ या बोईंग ७८७-८ या विमानाने उड्डाण केले. उड्डाणाला जवळपास ३६ मिनिटे उशीर झाला होता. ‘फ्लाईट रडार २४’वरील माहितीनुसार, या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळ ते हवेत स्थिरावले. पण काही अंतर जाताच डोव्हरच्या खाडीला वळसा घालून पुन्हा लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या दिशेने आले आणि विमानाचे ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आले.

यासंदर्भात ब्रिटिश एअरवेजकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. या विमानाचे हिथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग झाले. सर्व क्रू सदस्य आणि प्रवासी सुखरूपपणे खाली उतरले आहेत. नियमित प्रक्रियेनुसारच सारे काही पार पडले. या विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून लवकरात लवकर सर्व प्रवाशांना मार्गस्थ करण्यासाठी आमचे पथक कसोशीने प्रयत्न करत आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

लुफ्तान्साचे बोईंग विमान माघारी वळवले

लंडन/हैदराबाद : हैदराबादला जाणाऱ्या लु्फ्तान्सा विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने हवेतच यू-टर्न घेऊन हे विमान जर्मनीच्या फ्रँकफुर्ट विमानतळावर माघारी वळवण्यात आले, असे हैदराबाद विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

हे विमान भारतीय हवाई हद्दीबाहेर असताना त्याला बॉम्बची धमकी मिळाली होती. यामुळे हे विमान ज्या ठिकाणाहून आले आहे तेथे त्याला परतावे लागले. याआधी, लुफ्तान्साच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, विमानाला हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे हे विमान जर्मनीतील फ्रँकफुर्ट येथे परतले.

लखनऊ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

लखनऊ : लखनऊ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर (अमौसी विमानतळ) सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. सौदी अरेबियन एअरलाइन्सचे विमान लँडिंगनंतर टॅक्सी-वे वर जात असताना त्याच्या डाव्या चाकातून ठिणग्या आणि धुराचे लोट निघू लागले. हे विमान जेद्दाहून २८२ हज यात्रेकरूंना घेऊन परतले होते. प्रसंगावधान राखत वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) माहिती दिली, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सौदी अरेबियन एअरलाइन्सचे विमान एसव्ही ३८५२ शनिवारी रात्री जेद्दा विमानतळावरून लखनऊसाठी निघाले होते. या विमानात २८२ हज यात्रेकरू प्रवास करत होते. रन-वेवर यशस्वी लँडिंगनंतर विमान टॅक्सी-वेकडे जात असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या. ही बाब लक्षात येताच पायलटने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) याची सूचना दिली.

घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने फोम आणि पाण्याचा मारा करून केवळ २० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाला पुश बॅक करून टॅक्सी-वेवर आणण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हायड्रॉलिक सिस्टीममधील लिकेजमुळे विमानात बिघाड

प्रवाशांना सुखरूप उतरवल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने विमानाच्या चाकातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिंग दरम्यानच डाव्या बाजूच्या चाकात बिघाड झाला होता. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये लिकेज झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in