बर्फाच्या वादळाचा इशारा; न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी 'एअर इंडिया'ची सर्व उड्डाणे रद्द

अमेरिकेत संभाव्य बर्फाच्या वादळाच्या इशाऱ्यामुळे 'एअर इंडिया' ने न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीहून नेवार्कला येणारी-जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. २५ आणि २६ जानेवारीला ही विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रवाशांची आणि क्रू मेंबरच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे 'एअर इंडिया'ने सांगितले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: अमेरिकेत संभाव्य बर्फाच्या वादळाच्या इशाऱ्यामुळे 'एअर इंडिया' ने न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीहून नेवार्कला येणारी-जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. २५ आणि २६ जानेवारीला ही विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रवाशांची आणि क्रू मेंबरच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे 'एअर इंडिया'ने सांगितले.

'एअर इंडिया'ने प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर विशेषतःन्यू यॉर्क, न्यू जर्सी आणि आसपासचा परिसर या भागात रविवारी सकाळपासून सोमवारपर्यंत प्रचंड बर्फवृष्टी आणि कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या उड्डाण व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रवासी आणि क्रू कर्मचाऱ्यांची सुरक्षा, सुविधा आणि इतर गोष्टी पाहता २५ आणि २६ जानेवारीला न्यूयॉर्क आणि नेवार्कहून उड्डाण घेणारी विमाने रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या फ्लाईटबाबत अधिक माहितीसाठी 'एअर इंडिया'च्या अधिकृत वेबसाइट आणि 'कस्टमर सपोर्ट' शी संपर्क साधावा, असे आवाहन 'एअर इंडिया'ने केले आहे.

अमेरिकेत सध्या रेकॉर्डब्रेक हिमवादळाचे संकट आहे. त्यातून हे वादळ सेंट्रल प्लेन्सहून नॉर्थ ईस्टपर्यंत कोट्यवधी लोकांना प्रभावित करू शकते. प्रचंड बर्फवृष्टी, बर्फाचा पाऊस आणि कडाक्याची थंडी या कारणाने परिसरातील रस्ते बंद होतील. वीजपुरवठा खंडीत होऊन प्रवासी वाहतूकही ठप्प होण्याची शक्यता आहे, असा इशारा राष्ट्रीय हवामान खात्याने दिला आहे.

ट्रम्प यांचे निवेदन

दरम्यान, ट्रम्प यांनीही या संकटावरून निवेदन जारी केले आहे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 'एफईएमए' पूर्णपणे अलर्टवर आहे. संघ राज्य आणि स्थानिक प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीचा सामान करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. हिमवादळाचा धोका लक्षात घेता अत्यंत गरजेचे काम असेल तरच प्रवास करा, असे आवाहन लोकांना करण्यात येत आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी अमेरिकेतील बाधित भागात उड्डाणे मर्यादित किंवा रद्द केली आहेत.

अमेरिकेत ८ हजारांहून अधिक उड्डाणे रद्द

अमेरिकेला बर्फाच्या वादळाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता असल्याने देशातील जवळपास ८ हजारांहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in