

एअर इंडियाच्या दिल्ली-दुबई विमान प्रवासातील एका विचित्र आणि विनोदी घटनेने इंटरनेटवर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. विमानातील अधिकृत ‘कॅबिन डिफेक्ट लॉगबुक’मध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने केलेली नोंद व्हायरल झाली असून “उड्डाणादरम्यान सापडलेले जिवंत झुरळ, फाशी देऊन ठार मारण्यात आले” अशी नोंद वाचून नेटकरी हसून लोटपोट झालेत.
नेमकं काय घडलं?
ही अनोखी नोंद २४ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या एअर इंडियाच्या दिल्ली-दुबई विमान प्रवासादरम्यान करण्यात आली. हाताने लिहिलेल्या नोंदीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता त्यातील शब्दप्रयोग वाचून नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण झाले आहे. साधारणपणे अशा नोंदींचा उद्देश विमानातील तांत्रिक किंवा स्वच्छतेशी संबंधित समस्यांची नोंद करणे आणि त्यांचा अहवाल देणे हा असला तरी, "मरेपर्यंत फाशी" असा नाट्यमय उल्लेख केल्यामुळे नेटकरी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
नेमकं लॉगबुकमध्ये काय लिहिलं होतं?
२४ ऑक्टोबर रोजीच्या ‘एआय ३१५’ या विमानाच्या उड्डाणादरम्यान काय समस्या उद्भवली आणि त्यावर काय उपाययोजना केली याबाबत नोंदवहीत लिहिले आहे - “Cockroach found alive by guest - cockroach hanged until death.” म्हणजेच “प्रवाशाला जिवंत झुरळ दिसले - झुरळाला फाशी देऊन ठार केले.”
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
“हे चुकीचं आहे. झुरळ खरंच प्रवासी होता का, हे तपासलं का? त्याची बाजू ऐकण्याची संधी न देता अशी कारवाई कशी केली? एअर इंडियाला लाज वाटली पाहिजे.” अशा एकाहून एक मजेशीर प्रतिक्रिया नेटिझन्स व्हायरल झालेल्या फोटोखाली नोंदवत आहेत. दरम्यान, या व्हायरल नोंदीबाबत एअर इंडिया किंवा तिच्या देखभाल विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तथापि, हशा आणि मीम्सच्या या लाटेत काही वापरकर्त्यांनी स्वच्छता आणि विमानांमधील कीटक नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबतही (विशेषतः आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या बाबतीत) चिंता व्यक्त केली आहे.