Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील मृतांची संख्या २७५वर; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

अहमदाबाद ते लंडन गॅटविक्स प्रवासाला निघालेले एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळल्यानंतर हाहाकार उडाला होता. पहिल्याच दिवशी २६६ जणांचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर आता अपघातस्थळावरून शनिवारी आणखी एक मृतदेह सापडला. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातून मलबा काढताना मृतदेह मिळाला असून या अपघातातील मृतांची संख्या २७५वर पोहोचली आहे.
Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील मृतांची संख्या २७५वर; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
Published on

अहमदाबाद : अहमदाबाद ते लंडन गॅटविक्स प्रवासाला निघालेले एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळल्यानंतर हाहाकार उडाला होता. पहिल्याच दिवशी २६६ जणांचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर आता अपघातस्थळावरून शनिवारी आणखी एक मृतदेह सापडला. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातून मलबा काढताना मृतदेह मिळाला असून या अपघातातील मृतांची संख्या २७५वर पोहोचली आहे. दरम्यान, विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत २७० हून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. याशिवाय २४८ लोकांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. आतापर्यंत १५ मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून बाकींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती दुर्घटनेचे नेमके कारण शोधेल आणि काय चुकले हे तपासेल आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नवीन उपाययोजना सुचवेल. या उच्चस्तरीय समितीचे नेतृत्व केंद्रीय गृहसचिव करतील. या समितीत नागरी उड्डाण मंत्रालय, भारतीय वायुसेना, नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरो, सिव्हिल एव्हिएशन महासंचालनालय (डीजीसीए), इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी सामील असतील. तसेच गुजरात सरकार, अहमदाबाद पोलीस, आपत्ती निवारण प्राधिकरण आणि फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञदेखील समितीचा भाग असतील.

आवश्यकतेनुसार यामध्ये अतिरिक्त विमानतंत्रज्ञ, कायदेशीर सल्लागार किंवा तपास अधिकारीही सामील केले जाऊ शकतात. समितीकडे फ्लाइट डेटा, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, विमान देखभाल नोंदी, एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) लॉग आणि साक्षीदारांचे जबाब यांसारख्या महत्त्वपूर्ण नोंदी उपलब्ध असतील.

ब्लॅक बॉक्स डीकोडींग करण्याचे काम सुरू

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, “विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून त्याचा डेटा डीकोड केला जात आहे. तर अनेक एजन्सी आणि उच्चस्तरीय पॅनेल या घटनेची व्यापक चौकशी करत आहेत. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) तत्काळ तैनात करण्यात आले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एएआयबीच्या महासंचालकांनी घटनास्थळी भेट दिली. ब्लॅक बॉक्सचे हे डीकोडिंग अपघातादरम्यान किंवा अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये प्रत्यक्षात काय घडले असेल याची सखोल माहिती देईल, असा विश्वास आहे.”

बोईंग विमानांची उड्डाणापूर्वी सुरक्षा तपासणी अनिवार्य

विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) महत्त्वाचे पाऊल उचलले असून बोईंग ७८७ ड्रीमलायनर या विमानांची उड्डाणापूर्वीची संपूर्ण सुरक्षा तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. जेनएक्स इंजिनने चालणाऱ्या सर्व ड्रीमलाइनर्सची तपासणी करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. यामध्ये विमानांच्या उड्डाणापूर्वी संपूर्ण सुरक्षा तपासणी, इंधन पॅरामीटर देखरेख आणि संबंधित सिस्टिमची तपासणी, केबिन एअर कॉम्प्रेसर आणि संबंधित सिस्टिमची तपासणी, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणाली चाचणी, हायड्रॉलिक सिस्टिमची तपासणी, टेक-ऑफ पॅरामीटर्सची तपासणी करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले आहेत.

एअर इंडियाकडून २५ लाखांची अतिरिक्त मदत जाहीर

विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाने १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असतानाच आता विमान कंपनी एअर इंडियाने अतिरिक्त २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. “विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना आणि एकमेव बचावलेल्या व्यक्तीला २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे,” असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in