'४ वाजेपर्यंत कामावर या, अन्यथा...' : AI Express ने 'सिक लिव्ह' घेणाऱ्या ३० जणांना काढून टाकले; इतरांना अल्टिमेटम पाठवले

टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सुमारे २०० ते ३०० कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देत (सिक लीव्ह) सामुहिक सुट्टी घेतली होती.
'४ वाजेपर्यंत कामावर या, अन्यथा...' : AI Express ने 'सिक लिव्ह' घेणाऱ्या ३० जणांना काढून टाकले; इतरांना अल्टिमेटम पाठवले
Published on

नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सुमारे २०० ते ३०० कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देत (सिक लीव्ह) सामुहिक सुट्टी घेतली होती. परिणामी कंपनीला मंगळवारी रात्रीपासून जवळपास ८० उड्डाणे रद्द करावी लागली आणि देशातील विविध विमानतळांवर हजारो प्रवाशांना तिष्ठत राहावे लागले. त्यानंतर एअर इंडियाने बुधवारी रात्री किमान ३० क्रू मेंबर्सला कामावरून काढून टाकले. या क्रू मेंबर्सला कंपनीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढून टाकण्यात आल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता -

कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांचा हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना आज दुपारी ४ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा अल्टिमेटम दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय कंपनीने १३ मेपर्यंत उड्डाण सेवेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १३ मेपर्यंत दररोज कंपनीच्या किमान ४० विमानांचे उड्डाण रद्द होतील, असे समजते.

एअर इंडियाची मंगळवारी (७ मे) रात्रीपासून जवळपास ८० उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे देशातील विविध विमानतळांवर हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. कंपनीच्या गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देत सेवेत रुजू होण्यास असमर्थता दर्शविली, असे बुधवारी ( ८ मे) सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेमुळे ८० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली तर, काही उड्डाणांना विलंब झाला. कोची, कालिकत, दिल्ली आणि बंगळुरू विमानतळांवर सेवा विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण का दिले याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीच्या प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचा पूर्ण परतावा मिळेल, असे सांगण्यात आले आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने अहवाल मागवला

नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द झाल्याबद्दलचा अहवाल मागवला आहे. कंपनीला भेडसावणाऱ्या समस्या तत्परतेने सोडवाव्यात आणि ‘डीजीसीए’च्या निकषांप्रमाणे प्रवाशांना सुविधा मिळतील असे पाहावे, अशा सूचनाही मंत्रालयाने दिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in