आज टाटा समूहाने एअर इंडियासाठी २५० विमाने खरेदी करण्याचा करार फ्रान्सच्या कंपनीसोबत केला आहे. दोन्ही कंपन्यांमधील हा करार आत्तापर्यंतचा इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे सांगितले जात आहे.
या करारांतर्गत टाटा समूहाच्या मालकीची एअरलाइन, एअरबसकडून ४० वाइड-बॉडी ए ३५० आणि २१० लहान बॉडी विमाने खरेदी करणार आहे. या करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचे या करारासाठी अभिनंदन केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आजच्या ऐतिहासिक करारासाठी एअर इंडिया आणि एअर बसचे अभिनंदन. हा महत्त्वाचा करार भारत आणि फ्रान्समधील घनिष्ठ संबंध तसेच भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील यश आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतो. भारताच्या 'मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड' व्हिजन अंतर्गत एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थैर्याचा मुद्दा असो किंवा जागतिक अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा असो, भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे सकारात्मक योगदान देत आहे. तसेच, पुढील १५ वर्षांत भारतीय वायू दलाला २ हजारांहून अधिक विमानांची गरज आहे. " अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.