

नवी दिल्ली : विमानामध्ये बिघाड असतानाही त्याचे उड्डाण केल्याप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाच्या एका वैमानिकावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हे प्रकरण फ्लाइट एआय-३५८ आणि तिच्याशी संबंधित एआय-३५७ चे आहे. ‘डीजीसीए’नुसार विमानात आधीपासूनच अनेक तांत्रिक बिघाड नोंदवले गेले होते. तरीही विमानाचे उड्डाण करण्यात आले. एआय-३५८ दरम्यान लेफ्ट एअर सायकल मशीन आणि पॅक मोडशी संबंधित इशारा मिळाला. तसेच, आर-२ दरवाजाजवळ धुरासारख्या वासाची तक्रारही झाली. याच प्रणालीशी संबंधित बिघाड यापूर्वीच्या ५ उड्डाणांमध्येही नोंदवले गेले होते.
डीजीसीएने सांगितले की, तपासणीत असे आढळून आले की व्हीटी-एएनआय या विमानाला मिनिमम इक्विपमेंट लिस्टच्या (एमईएल) निमांनुसार उड्डाणासाठी मंजुरी दिली नव्हती. लोअर राईट रीसर्कुलेशन फॅनशी संबंधित एमईएल नियमांचे पालन झाले नाही. हे नागरी विमान वाहतूक आवश्यकता सीएआरचे उल्लंघन आहे. पायलट आणि क्रूने तांत्रिक स्थिती आणि सुरक्षा जोखमीचे योग्य मूल्यांकन केले नाही. पायलटला १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, एअरक्राफ्ट रूल्स आणि सीएआरअंतर्गत कारवाई, निलंबनापर्यंत होऊ शकते. उत्तर न दिल्यास डीजीसीए एकतर्फी निर्णय घेऊ शकते.