एअर इंडियाच्या वैमानिकाच्या निवृत्तीचे वय आता ६५

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया या विमान कंपनीने आपल्या वैमानिकांच्या निवृत्तीच्या वयात वाढ केली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाचे वैमानिक ५८ ऐवजी ६५व्या वर्षी निवृत्त होतील. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या वैमानिकाच्या निवृत्तीचे वय आता ६५
Published on

नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया या विमान कंपनीने आपल्या वैमानिकांच्या निवृत्तीच्या वयात वाढ केली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाचे वैमानिक ५८ ऐवजी ६५व्या वर्षी निवृत्त होतील. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात आले आहे.

एअर इंडियामध्ये सुमारे २४ हजार कर्मचारी आहेत. यामध्ये ३,६०० वैमानिक आणि ९,५०० केबिन क्रू सदस्यांचा समावेश आहे. तथापि, वैमानिकांप्रमाणेच केबिन क्रू सदस्यांचे निवृत्तीचे वयही ६५ वर्षे करण्यात आले आहे की नाही, याला दुजोरा मिळू शकला नाही. मात्र त्यांचेही निवृत्ती वय ६५ वर्षे करण्याचा एअर इंडियाचा विचार आहे.

यापूर्वी विस्तारा एअरलाइन्सचे वैमानिक ६५ व्या वर्षी निवृत्त होत असत. विस्तारा कंपनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एअर इंडियामध्ये विलीन झाली. त्यामुळे वैमानिकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आले आहे. यामुळे सर्व वैमानिकांसाठी नियम समान होतील. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी एका बैठकीत निवृत्तीचे वय वाढवण्याची घोषणा केली.

एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, “वैमानिकांच्या नवीन निवृत्तीच्या वयाबाबत ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळाली आहे. ‘डीजीसीए’ने एअर इंडियाच्या वैमानिकांना ६५ वर्षांपर्यंत व्यावसायिक उड्डाणे करण्याची परवानगी दिली आहे.” विस्तारा आणि एअर इंडियाच्या वैमानिकांमधील मतभेदांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी एअर इंडियाने त्यांच्या वैमानिकांचे निवृत्तीचे वय वाढवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in