
नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच या विमानाच्या दोन्ही इंजिनांना होणारा इंधनाचा पुरवठा खंडित झाला, परिणामी इंजिनांचे काम बंद पडले आणि हे विमान कोसळले, असा निष्कर्ष या अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे.
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने प्रसिद्ध केला आहे. या दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला होता. प्रकाशित झालेल्या १५ पानांच्या अहवालात अपघाताच्या चौकशीचे प्राथमिक निष्कर्ष आणि स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान विमानतळाजवळील वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळले. विमानाच्या डेटा रेकॉर्डरच्या तपासणीत असे आढळून आले की, उड्डाणानंतर काही सेकंदांतच दोन्ही इंजिनांनी काम करणे थांबवले. कारण त्यांना होणारा इंधन पुरवठा खंडित झाला होता. रॅम एअर टर्बाइनमुळे (आरएटी) पुरवठ्यात अडथळा आल्याचे संकेत मिळाले, सीसीटीव्ही फुटेजमधून ते स्पष्ट झाले आहे. विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (एएआयबी) १२ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध केलेला प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. एअर इंडिया नियामक आणि इतर संबंधित घटकांसोबत मिळून काम करत आहे. तपासात प्रगती होत असताना कंपनी एएआयबी आणि इतर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत राहील, असेही एअर इंडियाने म्हटले आहे.
पक्षी आदळल्याचे पुरावे नाहीत
विमानाला कोणताही पक्षी आदळल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा आढळलेला नाही. हवामान स्वच्छ होते आणि वाऱ्याचा वेगही कमी होता. दोन्ही वैमानिकांकडे पुरेसा उड्डाण अनुभव होता. प्राथमिक अहवालात घातपाताचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
अपघातापूर्वीचा घटनाक्रम
१२ जून २०२५ : सकाळी ११:१७ः एअर इंडियाचे : ड्रीमलायनर विमान व्हीटी-एएनबी, उड्डाण क्रमांक एआय ४२३ विमान नवी दिल्लीहून अहमदाबादमध्ये उतरले. दुपारी १ १८ः ३८ वाजता विमान विमानतळावरील 'बे ३४' मधून बाहेर पडताना दिसले. (१ः२५:१५) विमान कर्मचाऱ्यांनी टॅक्सीसाठी परवानगी मागितली. हवाई वाहतूक नियंत्रणाने (एटीसी) परवानगी दिली. विमान टॅक्सीवे आर४ मार्गे धावपट्टी २३ कडे जाऊ लागले. उड्डाणासाठी सज्ज झाले. (१ : ३२ : ०३) विमानाचे नियंत्रण ग्राउंड कंट्रोलकडून टॉवर कंट्रोलकडे हस्तांतरित झाले. विमानाला उड्डाणासाठी परवानगी. १: ३७ : ३७ वाजता विमानाने धावपट्टीवरून वेग घेण्यास सुरुवात केली. (१ : ३८:३९) : विमानाने जमिनीवरून हवेत झेप घेतली. तपास अधिकाऱ्यांच्या मते, एअर/ग्राउंड सेन्सर्स 'एअर मोड'मध्ये गेल्याने टेक-ऑफ झाल्याचे दर्शवते. (१ः ३८ः ४२) : विमानाने १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला. यानंतर तत्काळ विमानाचे इंजिन १ आणि इंजिन २ चे इंधन कटऑफ स्विच एका सेकंदाच्या अंतराने रन वरून कटऑफ स्थितीत गेले.
निष्कर्ष काढण्याची घाई नको नायडू, मोहोळ यांचे आवाहन
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी शनिवारी केले.
नायडू म्हणाले की, नागरी विमान वाहतूक मंत्रालय या अहवालाचे सखोल विश्लेषण करत आहे. आपण कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण एका ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकू. दरम्यान, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सांगितले की, वैमानिकांमधील संवाद अत्यंत संक्षिप्त असल्याने केवळ त्यांच्या बोलण्याच्या आधारावर कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.
एअर इंडियाचे निवेदन
दरम्यान, हा अहवाल समोर आल्यानंतर एअर इंडियानेही यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. १२ जुलै २०२५ रोजी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने जारी केलेल्या प्राथमिक अहवालाची आम्ही पुष्टी करतो आणि त्याचा आढावा घेत आहोत, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. तसेच आम्ही या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
विमान हवेत असताना इंधन नियंत्रण स्विच कटऑफवरून रन स्थितीत आणले जातात, तेव्हा प्रत्येक इंजिनचे फुल अथॉरिटी डिजिटल इंजिन कंट्रोल (एफआयडीईसी) स्वयंचलितपणे इग्निशन आणि इंधन पुरवठा पुन्हा सुरू करून इंजिन रि-लाइट (पुन्हा सुरू) करण्याची आणि थ्रस्ट रिकव्हरीची प्रक्रिया सांभाळते. इंजिन १ ची गती कमी होणे थांबले आणि ते पुन्हा पूर्ववत होऊ लागले. इंजिन २ पुन्हा सुरू (रि-लाइट) होऊ शकले, परंतु गती कमी होण्यावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत.
स्विच बंद कसे झाले?
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एक वैमानिक विचारताना ऐकू येते, तुम्ही स्विच बंद का केले, त्यावर दुसरा वैमानिक उत्तर देतो, मी बंद केले नाही. त्यामुळे, इंधन नियंत्रण स्विच नेमके बंद कसे झाले, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले. एक इंजिन काही काळासाठी सुरू झाले, परंतु दुसरे सुरू होऊ शकले नाही. अपघातापूर्वी विमान ३२ सेकंद हवेत होते. विमानाचे थ्रस्ट लिव्हरसुद्धा निष्क्रिय अवस्थेत आढळले, ज्यामुळे त्यात बिघाड असल्याचे सूचित होते. टेकऑफच्या वेळी विमानाला थ्रस्ट मिळाला होता. विमानाची फ्लॅप सेटिंग ५ अंश आणि गिअर 'डाऊन' (खाली) स्थितीत होते, जी उड्डाणासाठी योग्य स्थिती मानली जाते. इंधन स्विचमधील संभाव्य बिघाडासंदर्भात एफएफएने सूचना दिली होती, परंतु एअर इंडियाने त्याची तपासणी केली नव्हती. विमानाचे वजन निर्धारित मर्यादेत होते आणि विमानात कोणताही धोकादायक माल नव्हता.