नववर्षात एअर इंडियाचा नवा लुक- वैमानिक, कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल; मनीष मल्होत्रा यांचे डिझाइन

कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन गणवेश बनवला असून पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने त्याचा वापर सुरू केला जाणार आहे.
नववर्षात एअर इंडियाचा नवा लुक- वैमानिक, कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल; मनीष मल्होत्रा यांचे डिझाइन
PM

मुंबई : भारताची प्रमुख विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया नववर्षात नव्या लुकसह ग्राहकांच्या सेवेत हजर होणार आहे. कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन गणवेश बनवला असून पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने त्याचा वापर सुरू केला जाणार आहे.

उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या एअर इंडियाने ९० वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. जेआरडींना स्वत:ला विमानोड्डाणाची विशेष आवड होती. त्यांनी ब्रिटिश हवाईदलातील निवृत्त वैमानिक नेव्हिल विंटसेंट यांच्या सहकार्याने १९३२ साली टाटा एअर लाइन्सची स्थापना केली. कंपनीने १५ ऑक्टोबर १९३२ रोजी कराची ते मुंबई असे पहिले विमानोड्डाण केले. त्याचे सारथ्य खुद्द जे.आर.डीं.नी केले होते. पुढील काळात कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले गेले. उच्च व्यावसायिक मूल्ये, वक्तशीरपणा, ग्राहकांच्या सेवेला प्राधान्य, कर्मचाऱ्यांच्या वागण्या-बोलण्यातील खानदानी अदब या गोष्टी कंपनीला खास ओळख देऊन गेल्या. अल्पावधीत कंपनीने जगभरात स्वत:चीच नव्हे तर भारताची एक स्वतंत्र प्रतिमा तयार केली. कंपनीचे मानचिन्ह असलेला महाराजा भारतीय अतिथ्यशीलतेचे प्रतीक बनला. अलीकडच्या काळात सरकारी मालकीच्या या कंपनीला तोट्याला सामोरे जावे लागत होते. अखेर कंपनी पुन्हा टाटा समूहात दाखल झाली आणि इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले.

आता एअर इंडियाने नव्या युगात नवीन रूपात ग्राहकांसमोर येत आहे. कंपनीने वैमानिक कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल केला आहे. नवा गणवेश मुंबईतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी तयार केला आहे. त्यात प्रामुख्याने लाल, जांभळा आणि सोनेरी रंग वापरला आहे. गणवेश बनवताना भारतीय संस्कृती आणि परंपरा, अद्ययावत फॅशन, वापरण्यातील सुलभता आणि रुबाबदारपणा यांचा विचार केला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे डिझाइन तयार करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आभार आणि समाधान व्यक्त केले. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कँपबेल विल्सन यांनी नवा गणवेश भारतीय परंपरा आणि मनीष मल्होत्रा यांच्या कल्पकतेला साजेसा असल्याचे म्हटले. तसेच त्याने कंपनीच्या भविष्यात नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. कंपनीचे साधारण दहा हजार कर्मचारी असून त्यांना नवीन गणवेशाचे वेगवेगळ्या टप्प्यात वितरण केले जाईल.

नव्या युगाला साजेसे नवे रूप

एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे आल्यानंतर कंपनीने अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. कंपनीच्या ताफ्यात अनेक नवी विमाने दाखल होणार आहेत. एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ४७० नवी आणि अत्याधुनिक विमाने विकत घेण्याचे करार केले आहेत. एअर इंडियाने विकत घेतलेल्या एअरबस ए-३५० प्रकारच्या विमानांचे लवकरच लाँचिंग केले जाईल. त्यावेळी नवीन गणवेशाच्या वापराचा पहिला टप्पा सुरू होईल.

logo
marathi.freepressjournal.in