ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला

२१ हजार कोटी रुपयांचा प्रकल्पसुद्धा गुजरातमध्ये गेल्याने आता सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार टीका होत आहे
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला

वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातने पळवल्यामुळे नुकतेच सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकार टीकेचे धनी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारवासारव करत टाटा-एअरबसचा प्रकल्प राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये होईल, असे म्हटले होते. मात्र, टाटा एअरबसचा २१ हजार कोटी रुपयांचा प्रकल्पसुद्धा गुजरातमध्ये गेल्याने आता सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा जोरदार टीका होत आहे. वडोदरामध्ये भारतीय हवाई दलाच्या सी-२९५ विमानाच्या निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या प्रकल्पाची पायाभरणी ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

भारतातील टाटा समूह आणि यूरोपियन कंपनी एअरबस यांच्यावतीने संयुक्तपणे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एअरबस ही यूरोपमधील महत्त्वाची विमान निर्मिती करणारी कंपनी आहे. भारतात सी-२९५ विमान निर्मितीसाठी परवानगी मिळवणारी ही पहिली परदेशी कंपनी ठरली आहे.

टाटा एअरबस यांच्याकडून वडोदरामधील प्रकल्पात ४० विमानांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय एअरफोर्ससाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती आणि निर्यातीच्या उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिवांच्या हवाल्याने दिली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस सोबत ५६ सी-२९५ विमानांच्या निर्मितीसाठी २१ हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. भारतीय हवाई दलातील जुन्या झालेल्या एवीआरओ-७४८ या विमानांची जागा सी-२९५ विमाने घेणार आहेत. भारतीय हवाई दलासाठी पहिल्यांदा खासगी कंपनी विमानांची निर्मिती करणार आहे.

भारत सरकार आणि एअरबस यांच्यातील करारानुसार पहिली १६ विमाने पुढील चार वर्षात स्पेनमध्ये निर्मिती असलेली भारतीय हवाई दलाला दिली जाणार आहेत. ४० विमानांची निर्मिती टाटा अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम्स यांच्या संयुक्त प्रकल्पात केली जाणार आहे. सी-२९५ च्या द एअरबस डिफेन्स अँड स्पेस क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमला भारतीय नियामक संस्था डीजीएक्यूएनं परवानगी दिली आहे.

सी-२९५ विमान हे हवाई दलासाठी महत्त्वाचं समजलं जातं. मोठ्या संख्येनं सैनिकांची वाहतूक करण्यासाठी सी-२९५ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एअरबस भारतात टाटा आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत डायनामिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी करार करणार आहे.

वर्षापूर्वीच प्रकल्प गुजरातला गेला - केशव उपाध्ये

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “जो प्रकल्प एक वर्षापूर्वीच गुजरातला गेला, त्यावर आता टीका करणे हे एका अर्थाने अपयश लपविण्याचा प्रयत्न आहे. ज्या एअरबस प्रकल्पावरून वाद निर्माण केला जात आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये सांमजस्य करार झाला तेव्हा राज्यात मविआ सरकार होते. उद्धव ठाकरे यांनी एक पत्र पाठपुराव्यासाठी केल्याचे मविआ सरकारने दाखवावे. त्यांनी कोणताच पाठपुरावा केला नाही. यानंतर एक वर्षापूर्वी प्रकल्प गुजरातला गेला,” असा दावा उपाध्ये यांनी केला.

महाराष्ट्रावर केलेला सर्जिकल स्ट्राइक -तपासे

टाटा एअरबसचा नागपुरात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. गुजरातने महाराष्ट्रावर केलेला हा सर्जिकल स्ट्राईक आहे. आधीच दोन प्रकल्प गेले आहेत. आता हा एअरबस प्रकल्पदेखील गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन हे प्रकल्प कसे येतील, यासंदर्भात प्रयत्न करायला पाहिजे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in