अजित डोवाल रशिया दौऱ्यावर; अमेरिकेच्या 'टॅरिफ'च्या धमकीबाबत होणार चर्चा?

भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यामुळे तेथे ते कोणती चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित डोवाल रशिया दौऱ्यावर; अमेरिकेच्या 'टॅरिफ'च्या धमकीबाबत होणार चर्चा?
Published on

नवी दिल्ली : भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यामुळे तेथे ते कोणती चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत आणि अमेरिकादरम्यान व्यापार कराराबाबत अद्याप सहमती झालेली नाही. ट्रम्प हे भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात इंधन, शस्त्रास्त्र खरेदी करतो, यावर ट्रम्प यांनी आक्षेप नोंदविला होता. यानंतर आता अजित डोवाल हे रशियात पोहोचले आहेत. त्यांचा हा नियोजित दौरा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अमेरिकेच्या ‘टॅरिफ वॉर’मुळे या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

द्विपक्षीय चर्चा

अजित डोवाल यांच्या रशिया भेटीमध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील व्यापाराची चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. रशियातील वृत्तसंस्था ‘तास’च्या वृत्तानुसार, डोवाल यांच्या दौऱ्यात भारत आणि रशियातील द्विपक्षीय भागीदारी, संरक्षण क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित इतर विषयांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी अजित डोवाल मंगळवारीच मॉस्कोत पोहोचले आहेत.

डोवाल यांच्या भेटीत भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘एस-४००’ या डिफेन्स मिसाइल सिस्टीम खरेदीवरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच भारताची संरक्षण यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी रशियाच्या ‘एसयू ५७’ या लढाऊ विमानांची खरेदी करण्याबाबतही चर्चा या भेटीत होऊ शकते. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही २७ आणि २८ ऑगस्ट रोजी रशियाचा दौरा करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in