

नवी दिल्ली: भारताने केवळ सीमांवरच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या आणि इतर सर्व पातळ्यांवर स्वतःला बळकट केले पाहिजे, जेणेकरून हल्ले आणि गुलामगिरीच्या वेदनादायी इतिहासाचा 'सूड' घेता येईल, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी सांगितले. 'विकसित भारत युवा नेते संवाद' च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
ते म्हणाले की, 'तुम्ही स्वतंत्र भारतात जन्माला आलात, हे तुमचे भाग्य आहे. मी गुलाम भारतात जन्मलो. आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि असंख्य हालअपेष्टा सहन केल्या. भगतसिंग यांना फाशी देण्यात आली, सुभाषचंद्र बोस यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि महात्मा गांधींना सत्याग्रह करावा लागला, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले,' असे ते म्हणाले.
'सूड' हा शब्द चांगला नाही, पण तो एक मोठी प्रेरक शक्ती ठरू शकतो. आपल्याला आपल्या इतिहासाचा सूड घ्यायचा आहे. सीमासुरक्षा, अर्थव्यवस्था, सामाजिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात या देशाला पुन्हा महान बनवायचे आहे, असे डोवाल म्हणाले. नेपोलियन एकदा म्हणाला होता, 'मेंढ्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या १ हजार सिंहांपेक्षा सिंहाच्या नेतृत्वाखाली असलेल्या
१ हजार मेंढ्यांची मला अधिक भीती वाटते.' नेतृत्व किती महत्त्वाचे आहे, हे यावरून कळते. आपण एक प्रगत समाज होतो. आम्ही इतर संस्कृतींवर किंवा त्यांच्या मंदिरांवर आक्रमण केले नाही. पण सुरक्षेबाबत आपण जागरूक नव्हतो, म्हणून इतिहासाने आपल्याला धडा शिकवला.
अटी लादण्यासाठीच संघर्ष होतात
डोवाल म्हणाले की, जगातील प्रत्येक संघर्ष सुरक्षेच्या चिंतेतूनच जन्म घेतो. "संघर्ष का होतात? लोकांना मृतदेह पाहून आनंद मिळतो म्हणून नव्हे. तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि शत्रूराष्ट्राला आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी संघर्ष होतात. आज जगातील कोणताही संघर्ष पाहा. तो सुरक्षेसाठी एकमेकांवर अटी लादण्याबाबतच असतो. म्हणून आपल्यालाही स्वतःचे संरक्षण करावे लागेल, असे ते म्हणाले.