‘अल-कायदा’चा म्होरक्या ड्रोन हल्ल्यात ठार;अमेरिकेच्या कारवाईमुळे तालिबान संतापले

ऑगस्ट २०११मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यापासून जवाहिरी काबूलमध्ये राहत होता
 ‘अल-कायदा’चा म्होरक्या ड्रोन हल्ल्यात ठार;अमेरिकेच्या कारवाईमुळे तालिबान संतापले

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने ‘अल-कायदा’चा म्होरक्या अल-जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केले. जवाहिरीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी जवाहिरीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ‘अल-कायदा’चा संस्थापक ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर जवाहिरीने २०११ मध्ये दहशतवादी संघटनेची सूत्रे हाती घेतली होती.

हा ड्रोन हल्ला अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’च्या विशेष पथकाने केला. ऑगस्ट २०११मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यापासून जवाहिरी काबूलमध्ये राहत होता. अमेरिकेच्या या कारवाईमुळे तालिबान संतापले असून, त्यांनी हे ‘दोहा करारा’चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

जवाहिरीचा खात्मा करण्यासाठी काबूलच्या शेरपूर भागात हा ड्रोन हल्ला करण्यात आला. तालिबानच्या दाव्यानुसार, स्ट्राइकदरम्यान मोठा आवाज ऐकू आला होता.

शोधून मारले, ऑपरेशन यशस्वी - बायडेन

अल-जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, “आम्ही जवाहिरीला शोधून मारले. अमेरिका आणि तिथल्या लोकांना निर्माण होणारा कोणताही धोका आम्ही दुर्लक्षित करणार नाही. आम्ही अफगाणिस्तानातील दहशतवादावर हल्ला सुरूच ठेवणार आहोत.”

अल जवाहिरीने यावर्षी एप्रिलमध्ये नऊ मिनिटांचा व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने फ्रान्स, इजिप्त आणि हॉलंड हे देश इस्लामविरोधी असल्याचे म्हटले होते. व्हिडीओमध्ये जवाहिरीने भारतातील हिजाबच्या वादावरही चिथावणीखोर वक्तव्य केले होते.

जवाहिरीची पार्श्वभूमी

अल जवाहिरीचा जन्म १९ जून १९५१मध्ये एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला होता. अरबी आणि फ्रेंच भाषक असलेला जवाहिरी हा पेशाने सर्जन होता. वयाच्या १४व्या वर्षी तो ‘मुस्लीम ब्रदरहूड’चा सदस्य झाला. १९७८मध्ये कैरो विद्यापीठातील तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी अजा नोवारीशी त्याने लग्न केले. कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लग्नाने त्या काळातील उदारमतवादी कैरोचे लक्ष वेधून घेतले, कारण या विवाहाने पुरुषांना स्त्रियांपासून वेगळे केले. छायाचित्रकार आणि संगीतकारांना दूर ठेवण्यात आले. हसणे आणि मस्करी करणेदेखील निषिद्ध होते. जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (इआयजे) स्थापन केला. १९७०च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध करणारी ही लढाऊ संघटना होती. त्याची इच्छा इजिप्तमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्याची होती. १९८१ मध्ये इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेल्या आणि छळ करण्यात आलेल्या शेकडो लोकांमध्ये जवाहिरीचा समावेश होता. तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तो देश सोडून सौदी अरेबियात आला. सौदीत आल्यानंतर त्याने एका औषध विभागात प्रॅक्टिस सुरू केली. सौदी अरेबियातच अल जवाहिरीने ‘अल-कायदा’ प्रमुख ओसामा बिन लादेनशी भेट घेतली होती. बिन लादेन १९८५ मध्ये पेशावर, पाकिस्तानमध्ये ‘अल-कायदा’चा प्रसार करण्यासाठी गेला होता. यावेळी अल जवाहिरीही पेशावरमध्ये होता. येथूनच या दोन दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले. २००१ मध्ये अल जवाहिरीने ‘इआयजे’चे ‘अल-कायदा’मध्ये विलीनीकरण केले. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी मिळून जगाला हादरवण्याचा कट रचला. अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. २०११ मध्ये तो ‘अल-कायदा’चा प्रमुख बनला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in