नवी दिल्ली : मोठ्ठा गाजावाजा करून कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणलेल्या २० चित्त्यांपैकी ८ चित्त्यांचा अलीकडे एकापाठोपाठ एक असा मृत्यू झाला. यापैकी पाच चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेच झाला असल्याचे स्पष्टीकरण पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.
चित्त्यांच्या मृत्यूमागील कारणांचे सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाता असून, त्यासंबंधी तपास सुरू आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ज्ञांची मदत देखील घेतली जात आहे. तसेच दक्षिण आफ्रिका व नामिबियातील प्राण्यांच्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला जात आहे. त्याचप्रमाणे देशातील स्वतंत्र तज्ज्ञ देखील आपल्या पातळीवर यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. चित्त्यांची व्यवस्था, सुरक्षितता, व्यवस्थापनातील शिफारशी, वैद्यकीय सुविधा आणि प्रशिक्षण व क्षमतावर्धन अशा बहुआयामी पातळीवर संशोधन व विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. चित्ता प्रकल्प समिती अत्यंत काळजीपूर्वक परिस्थितीची देखरेख करीत असून, आतापर्यंतच्या कामगिरीबाबत समाधानी देखील आहे. चित्ता संवर्धन प्रकल्पासाठी आता अनेक उपाययोजना योजण्यात आल्या आहेत. त्यात चित्ता संशोधन केंद्राचाही समावेश आहे. लवकरच कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी वनक्षेत्र सामावून विस्तार केला जाणार आहे. तसेच आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. तसेच मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात चित्त्यांसाठी दुसरे घर तयार करण्यात येणार आहे.