
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवावे लागले, याची माहिती जगभरातील देशांना देण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांतील सदस्यांनी मायदेशी परतल्यानंतर मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. पाकिस्तानच्या कारवायांची जगभरातील देशांना माहिती देऊन पाकचा बुरखा फाडल्याची माहिती यावेळी सदस्यांनी पंतप्रधानांना दिली.
यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळातील अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीत सदस्यांनी आपले अनुभव पंतप्रधानांना कथन केले. या शिष्टमंडळात अनेक विद्यमान खासदार, माजी खासदार, माजी राजनैतिक अधिकारी आदींचा समावेश होता.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वीच या शिष्टमंडळाची भेट घेतली व पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यातील चार शिष्टमंडळाचे नेतृत्व सत्तारूढ आघाडीतील खासदारांनी केले. ज्यात भाजपचे दोन, जदयूचा एक, शिवसेनेच्या एका खासदाराचा समावेश होता, तर तीन शिष्टमंडळाचे नेतृत्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी केले. ज्यात काँग्रेस, द्रमुक व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आदींचे एक-एक खासदार सामील होते.