काँग्रेसची सर्व शक्ती एका घराण्यासाठी खर्च; द्वारका येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची टीका

लोकांना सुविधा पुरवण्याबाबत काँग्रेसकडे ईच्छाशक्ती आणि समर्पित भावना नव्हती. त्यांचा सगळा वेळ घोटाळे लपवण्यातच जात होता.
काँग्रेसची सर्व शक्ती एका घराण्यासाठी खर्च;  द्वारका येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची टीका

द्वारका : काँग्रेसची सर्व शक्ती एका घराण्याचे भले करण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष होत आहे. देशवासीयांना उत्तम सेवा-सुविधा पुरवण्यासाठी काँग्रेसकडे 'नियत' आणि 'निष्ठा' या दोन्हींचा अभाव आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. मोदी यांनी रविवारी गुजरातच्या किनाऱ्याजवळ समुद्रात लुप्त झालेल्या प्राचीन द्वारका नगरीचे स्कुबा डायव्हिंग करून दर्शन घेतले. मोदी यांनी ओखा आणि द्वारका यांना जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. त्यावेळी झालेल्या समारंभात मोदी यांनी विरोधकांवर जोरदार आसूड ओढले.

सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्यापूर्वी रविवारी सकाळी मोदी यांनी समुद्राच्या तळाला बुडालेल्या, भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन द्वारका नगरीचे दर्शन घेण्यासाठी नौदलाच्या पाणबुड्यांच्या मदतीने स्कुबा डायव्हिंग केले. तेथे त्यांनी भगवान श्रीकृष्णाला मोराचे पिस वाहून प्रार्थना केली. त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात मोदी यांनी म्हटले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना तत्कालीन काँग्रेस सरकारला येथे पूल बांधण्यासाठी सतत विनंती करत होतो. मात्र, काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर माझ्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकालात हा पूल पूर्ण झाला. या पुलाच्या बांधणीचे भाग्य माझ्याच नशिबात होते. आता द्वारकेला येणारे भक्त त्याचा लाभ घेऊ शकतील. समुद्राखाली प्राचीन द्वारका नगरीचे दर्शन घेतल्यावर मला स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. द्वारका नगरी ही प्राचीन भारतातील भव्य नगरनिर्माण कलेचा उत्तम नमुना होती. ती पाहून माझ्या डोळ्यांसमोर २१व्या शतकातील भव्य आणि विकसित भारताचे चित्र स्पष्ट झाले.

लोकांना सुविधा पुरवण्याबाबत काँग्रेसकडे ईच्छाशक्ती आणि समर्पित भावना नव्हती. त्यांचा सगळा वेळ घोटाळे लपवण्यातच जात होता. असे असताना देशवासीयांच्या भल्याचा विचार कसा करणार? त्यामुळे २०१४ सालापूर्वीच्या दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था जगातील केवळ ११व्या स्थानवर पोहोचू शकली. म्हणून मोठे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची क्षमताही विकसित झाली नाही. मात्र, भाजपच्या शासनकाळात देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या दृष्टीने विकास करत आहे, असेही यावेळी मोदी यांनी सांगितले.

देशातील सर्वांत लांब केबल-स्टेड पूल

गुजरातच्या देवभूमी द्वारका, जामनगर आणि पोरबंदर या तीन जिल्ह्यांतील साधारण ४१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा मोदी यांनी रविवारी शुभारंभ केला. त्यात बेत द्वारका नावाचे बेट आणि गुजरातच्या मुख्य भूमीवरील ओखा या ठिकाणांना जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचाही समावेश होता. अरबी समुद्रातील सुदर्शन सेतू २.२३ किमी लांबीचा आहे. तो देशातील सर्वाधिक लांबीचा केबल-स्टेड प्रकारचा पूल आहे. त्याच्या बांधणीसाठी ९७८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in