नवी दिल्ली/थिम्फू : दिल्लीत स्फोट घडविण्याचे कट-कारस्थान ज्यांनी रचले आहे, त्यांना सोडणार नाही, आमच्या तपास यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जातील, जे कुणी या घटनेसाठी जबाबदार आहेत त्यांना अद्दल घडवली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दहशतवाद्यांना दिला.
मोदी सध्या भूतान दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान भूतानमधील उच्चपदस्थांशी त्यांच्या सविस्तर बैठका होणार आहेत. भूतानचे राजे जिगमे खेसर यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारत व भूतान यांच्यातील संबंधांबाबत भूमिका मांडली. मात्र, त्याचवेळी त्यांच्या भूतान दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच दिल्लीत घडलेल्या स्फोटाच्या घटनेवरही मोदींनी भाषणादरम्यान भाष्य केले.
संपूर्ण देश पीडितांसोबत
मोदींनी आपल्या भाषणात दिल्ली स्फोटाबाबत शोक व्यक्त केला. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. भूतानमध्ये याप्रसंगी सहभागी होणे भारत व माझी बांधिलकी होती. पण आज मी इथे खूप भावनिक होऊन आलो आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयावह घटनेने सगळ्यांना दु:खी केले आहे. मी पीडित कुटुंबीयांचे दु:ख समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे, असे मोदी म्हणाले.
प्रत्येक आरोपीचा छडा लावा - अमित शहा
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कार बॉम्बस्फोटातील प्रत्येक आरोपीचा छडा लावा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या स्फोटानंतर शहा यांनी सलग दोन उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर ब्युरोचे संचालक तपन डेका, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि ‘एनआयए’चे महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात हे आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्फोटानंतरची स्थिती आणि तपासाची माहिती सविस्तर सादर केली, असे सूत्रांनी सांगितले.
लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा काही तासांपूर्वी जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात कार्यरत असलेल्या ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी मॉड्युलचा भंडाफोड झाल्यानंतरच झाला होता. यात ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गझवत-उल-हिंद’ या संघटनांचा सहभाग असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणात सोमवारी तीन डॉक्टरांसह ८ जणांना अटक झाली. यात २९०० किलो स्फोटके जप्त झाली. अटक केलेल्यांमध्ये फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉ. मुझम्मिल गणाई आणि डॉ. शाहीन सईद यांचा समावेश होता. त्या ठिकाणाहून ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले आहे.
स्फोटात ठार झालेला उमर हाही अल फलाह विद्यापीठाशी जोडलेला होता. त्याच्या नावावर असलेल्या ‘ह्युंदाई आय २०’ कारमध्ये स्फोट झाल्याचा संशय आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या अटकेनंतर तो पकडला जाईल या भीतीने त्याने हा हल्ला केल्याचा संशय आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुलवामा येथील हा डॉक्टर कारमध्ये स्फोटके घेऊन आला होता. हा आत्मघाती हल्ला असू शकतो, असेही तपास यंत्रणांनी सांगितले. स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डिटोनेटर वापरले गेले असावेत. कार ट्रॅफिक सिग्नलजवळ हळू चालत असताना तिच्यात स्फोट झाला.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलवामा जिल्ह्यातील तारिक नावाच्या व्यक्तीने ही ‘आय १०’ कार उमरला दिली होती, आता त्यालाही अटक करण्यात आली आहे.
‘यूएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी ‘यूएपीए’ आणि स्फोटक कायद्यांतर्गत, दहशतवादी कट व हल्ल्याशी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, ‘आम्हाला समजले की स्फोटापूर्वी ही कार जवळच्या पार्किंगमध्ये तीन तास उभी होती. त्यामुळे विविध पार्किंग लॉटचे फुटेज तपासले जात आहे.’
मृतांच्या नातेवाईकांना १० लाख
दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या व्यक्तींना ५ लाख, तर गंभीर जखमींना २ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे.
स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर
दिल्लीतील बॉम्बस्फोटात मृत पावलेल्यांची संख्या मंगळवारी १२ वर पोहोचली. स्फोटात जखमी झालेल्या आणखी चार जणांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
४२ पुरावे केले गोळा
न्यायवैज्ञक पथकाने स्फोटा स्थळावरून ४२ पुरावे गोळा केले आहेत. यात ‘आय २०’ कार ज्यात स्फोट झाला. त्याचे सुटे भाग, चेसीस, सीएनजी सिलिंडर, बोनेटचे भाग आदींचा समावेश आहे. बुधवारपासून या पुराव्यांची तपासणी केली जाईल.
स्फोटाचा तपास ‘एनआयए’कडे
केंद्रीय गृह मंत्रालयाने या स्फोटाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपवली आहे. या घटनेला सरकारने दहशतवादी हल्ला मानले असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. कारण ‘एनआयए’ला फक्त दहशतवादी प्रकरणांच्या चौकशीचा अधिकार आहे.
पुलवामातील डॉक्टर चालवत होता कार
दिल्लीत सोमवारी स्फोट झालेली कार डॉ. उमर नबी हा चालवत होता. या स्फोटात मृत पावलेल्या १२ जणांमध्ये त्याचा समावेश आहे. स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीर पोलिसांनी उमरच्या आईचे डीएनए नमुना घेतले आहेत. स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आम्ही डीएनए नमुना घेतला आहे, असे एका अधिकाऱ्याने श्रीनगरमध्ये सांगितले.