
गोहत्येसंदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी ‘गोहत्या करणारे नरकात सडतील’, अशी खळबळजनक टिप्पणी केली. ‘देशात गोहत्या बंदी लागू करायला हवी. गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गोहत्येचा आरोप असणाऱ्या एका आरोपीविरोधातील याचिका रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयासमोर दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व असल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, ही याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने गायींना संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केले जायला हवे, असे मत व्यक्त केले. तसेच, देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा. असे सांगतानाच न्यायालयाने गोहत्या करणारे नरकात सडतील, अशी टिप्पणी केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी गायीचे महत्त्व सांगताना न्यायालयाने गायींची पूजा करण्याच्या भारतीय परंपरेला थेट इसवीसन पूर्व सातव्या शतकापर्यंत जुना इतिहास असल्याचे नमूद केले. वेदिक काळापासून गायींची भारतीय संस्कृतीत पूजा होत असल्याचे ते म्हणाले. “भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, आपण सर्व धर्मांचा आदर करायला हवा. हिंदुत्वामध्ये अशी धारणा आहे, की गाय हे पावित्र्य आणि निसर्गाच्या देणगीचे प्रतीक आहे. त्यामुळेच गायींचे संरक्षण आणि संवर्धन व्हायला हवे”, असे न्यायालयाने नमूद केले.