प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादप्रकरणी मुस्लिम पक्षाने दाखल केलेली याचिका फेटाळली. हिंदू पक्षाने दाखल केलेल्या १८ याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
शाही ईदगाहचा अडीच एकर परिसर मशीद नसल्याचा, ते भगवान श्रीकृष्णांचे गर्भगृह असल्याचा दावा करणाऱ्या याचिका हिंदू पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आल्या होत्या. तर मशिदीसाठी जागा १९६८ मध्ये झालेल्या करारानुसार देण्यात आल्याचा युक्तिवाद मुस्लीम बाजूने करण्यात आला होता. या कराराला ६० वर्षांनंतर चुकीचे म्हणणे योग्य नाही. हिंदू बाजूच्या याचिका सुनावणीच्या योग्य नाहीत. मात्र, हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुस्लीम पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. आता हिंदू पक्षाच्या १८ याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. यापैकी अनेक याचिकांचे स्वरूप साधारणत: सारखेच आहे.
या प्रकरणामध्ये प्रार्थनास्थळांचा किंवा वक्फ बोर्ड कायदा लागू होत नाही. सध्या ज्या ठिकाणी शाही ईदगाह संकुल आहे ती श्रीकृष्ण जन्मभूमी आहे. करारानुसार मंदिराची जमीन शाही ईदगाह समितीला देण्यात आली असून, ती नियमांच्या विरोधात आहे, असे हिंदूंच्या बाजूने स्पष्ट करण्यात आले.