
अलाहाबाद : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने याचिकाकर्त्याला पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
याबाबतची याचिकाकर्त्याची याचिका उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ५ मे रोजी फेटाळून लावली होती. नवीन याचिका दाखल करताना, काही नवीन पुरावे सादर केल्याचा दावाही करण्यात आला. या याचिकेवर निर्णय होईपर्यंत राहुल गांधींच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
नागरिकत्वावर प्रश्न
ही याचिका कर्नाटकातील एस विघ्नेश शिशिर यांनी दाखल केली होती. शिशिर यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते आणि या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी केली होती. राहुल गांधींकडे युनायटेड किंग्डमचे (यूके) चे नागरिकत्व आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.