पाटणा : येत्या ३० जानेवारी रोजी गांधी जयंती आहे, त्यापूर्वी इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप निश्चित व्हावे, अशी इच्छा बिहारचे मुख्यमंत्री आणि इंडिया आघाडीचे एक प्रमुख नेते नितीश कुमार यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाकडून मिळाली आहे.
जनता दल युनायटेड पक्षाचे महासचिव संजय कुमार झा यांनी गेल्या महिन्यातील इंडिया आघाडीच्या बैठकीस नितीश कुमार यांच्यासोबत हजेरी लावली होती. ते म्हणाले की, आघाडीने मौल्यवान वेळ वाया घालवला आहे. आता जागावाटप तरी या महिनाअखेरीस गांधी जयंतीपूर्वी निश्चित होर्इल, अशी अपेक्षा बाळगुया. जागावाटपाबाबत आधीच खूप उशीर झाला आहे. त्याबाबत काहीच शंका नाही. आधीच्या एका बैठकीत नितीश कुमार यांनी ऑक्टोबरपूर्वी घटक पक्षांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. २ ऑक्टोबर रोजी राजघाटावरून आघाडीतील घटक पक्षांनी या बहुपक्षीय आघाडीची घोषणा केली होती. भाजपशी लढा द्यायचा असेल तर विरोधकांची मोठी आघाडी होणे गरजेचे आहे हे नितीश कुमार यांनी आधीच जोखले होते. म्हणूनच त्यांनी या आघाडीचा प्रस्ताव देशासमोर मांडला होता. तेव्हा काँग्रेस पक्ष पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे ही आघाडी स्थापन होण्यास विलंब झाला. तेव्हा आता तरी सर्व घटक पक्ष नितीश कुमार यांच्या सूचनेकडे लक्ष देऊन जानेवारी अखेरपर्यंत जागावाटपावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा करूया. इंडिया आघाडीने घार्इ केली तरच पुढील सरकार स्थापन करण्याचा आपण विचार करू शकतो.
इंडिया आघाडीने गतिमानता गमावली असून त्याला काँग्रेस पक्ष कारणीभूत असल्याचे नितीश कुमार यांनी अलीकडेच बोलून दाखवले होते. काँग्रेसने केवळ तेलंगणामध्ये यश मिळवले. पण राजस्थान, छत्तीसगड राज्यातील सत्ता गमावली. मध्य प्रदेशातील सत्ता टिकवण्यात भाजप यशस्वी ठरला. या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे भाजपचे मनोधैर्य खूपच बळावले आहे. यामुळे देशात तिसऱ्यावेळी सत्ता मिळवण्याची तयारी भाजप करीत आहे. यामुळे केवळ सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीसमोर मोठे आव्हान आहे, असे झा यांनी स्पष्ट केले आहे.