यंदा आंब्याला चांगला बहर; उष्णतेच्या लाटेचा परिणाम नाही

यंदा एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असेल. या महिन्यांत देशभरात दरवर्षी ज्या प्रमाणात उष्णता असते, त्यापेक्षा ती यंदा अधिक असेल. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेची लाट साधारण दोन ते चार दिवस असते.
यंदा आंब्याला चांगला बहर; उष्णतेच्या लाटेचा परिणाम नाही

नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट नेहमीपेक्षा जास्त दिवस आणि अधिक तीव्र राहणार असली तरी त्याचा देशातील आंबा उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. उलट या हंगामात देशातील आंब्याचे उत्पादन सरासरीपेक्षा १४ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज 'इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च'च्या (आयसीएआर) 'सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर'ने (सीआयएसएच) वर्तवला आहे.

यंदा एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असेल. या महिन्यांत देशभरात दरवर्षी ज्या प्रमाणात उष्णता असते, त्यापेक्षा ती यंदा अधिक असेल. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेची लाट साधारण दोन ते चार दिवस असते. यंदा ती १० ते २० दिवस टिकणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. त्याचा माणूस आणि अन्य प्राण्यांबरोबरच पिकांवरही परिणाम होणार आहे. मात्र, त्याचा आंब्याच्या उत्पादनावर विशेष परिणाम होणार नाही. उलट यंदा आंब्याचे देशभरातील सरासरी उत्पादन १४ टक्क्यांनी वाढेल. देशात २०२२-२३ साली आंब्याचे उत्पादन २१ दशलक्ष टन इतके झाले होते. त्यात २०२३-२४ साली १४ टक्क्यांची वाढ होऊन ते २४ दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज 'आयसीएआर-सीआयएसएच'चे संचालक टी. दामोदरन यांनी बुधवारी व्यक्त केला.

भारतात आंबा हे महत्त्वाचे नगदी फळ आहे. जगातील एकूण आंबा उत्पादनापैकी ४२ टक्के आंबा भारतात पिकतो. आंब्याच्या डझनावारी प्रजाती भारतात आहेत. आंब्याच्या आकर्षक रंग आणि चवीमुळे त्याला 'फळांचा राजा' म्हणून गौरवले जाते. देशातील ५० टक्के आंबा उत्पादन दक्षिणेकडील राज्यांत होते. तेथे गतवर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादन १५ टक्क्यांनी घटले होते. यंदा देशभरात हवामान बरेचसे अनुकूल असल्याने आंब्याला चांगला मोहोर आला आणि फलधारणाही व्यवस्थित झाली आहे.

अतिरिक्त उष्णतेचा आंबा उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. दक्षिणेकडील राज्यांत तर भरघोस आंबा उत्पादन होईल, असे संशोधकांना वाटते. त्यामुळे या उन्हाळ्यात बाजारात फळांच्या राजाची रेलचेल राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, तरी ग्राहकांना यंदा स्वस्तात आंबा खरेदी करण्यास मिळेल की नाही, याची अद्याप शाश्वती देता येत नाही.

बागांची काळजी गरजेची

यंदा देशात उष्णतेची मोठी लाट येणार असूनही आंब्याचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज आहे. पण त्यासाठी आंबा उत्पादकांनी बागांना हलके जलसिंचन करून मातीत ओलावा कायम राखणे गरजेचे आहे. अन्यथा, फळे झाडांवरून गळून पडण्याचे प्रमाण वाढू शकते. तसेच उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी आंब्याचे 'थ्रीप्स' कीटकांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक लिटर पाण्यात ४ मिलीलिटर 'इमिडाक्लोप्रिड' किंवा एक लिटर पाण्यात ०.४ ग्रॅम 'थायमिथॅक्झॅम' औषध मिसळून झाडांवर फवारणी करावी. देशाच्या काही भागांत आंब्यावर 'सेमीलूपर' अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेथे शेतकऱ्यांनी एक लिटर पाण्यात ०.५ मिलीलिटर 'लँबडासायहॅलोथ्रीन' औषध मिसळून झाडांवर फवारावे, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in