
श्रीनगर : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी मंगळवारपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने भाविकांना नोंदणी करता येणार असून त्यासाठी २२० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
अमरनाथ यात्रेला ३ जुलैपासून सुरुवात होणार असून ९ ऑगस्ट रोजी या यात्रेचा समारोप होईल. पहलगाम (अनंतनाग) आणि बालतल (गंदरबल) या दोन मार्गांनी ही यात्रा करता येईल. या यात्रेत ६ लाख भाविकांना परवानगी देण्यात येणार आहेत. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या (एसएएसबी) मार्च महिन्यात झालेल्या ४८ व्या बैठकीत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेच्या तारखा जाहीर केल्या. भाविकांसाठी सुविधा सुधारण्यासाठी अनेक प्रस्तावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तीर्थयात्रा अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित व्हावी, यासाठी श्राइन बोर्डाने ई-केवायसी, आरएफआयडी कार्ड, ऑन-स्पॉट नोंदणी आणि इतर व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जम्मू, श्रीनगर, बालटाल, पहलगाम, नुनवान आणि पंथा चौक येथे राहण्याची आणि नोंदणी व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.