
जम्मू : अमरनाथ यात्रेसाठी बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली असून जम्मू परिमंडळात निमलष्करी दलाच्या १८० हून अधिक कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गंडेरबल जिल्ह्यातील बालताल मार्ग अशा दोन मार्गांवरून ३ जुलैपासून पुढील ३८ दिवस अमरनाथ यात्रा आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी २ जुलै रोजी जम्मूस्थित भगवतीनगर तळ छावणीवरून काश्मीरला रवाना होणार आहे. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी यात्रेसाठी बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा उभी केली आहे, असे पोलीस महानिरीक्षक (जम्मू परिमंडळ)भीमसेन तुती यांनी सांगितले. दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्ही सुरक्षेच्या अधिक उपाययोजना आखल्या आहेत. निमलष्करी दलाच्या अधिक कंपन्या, सीसीटीव्हीद्वारे टेहळणी आणि संवेदनक्षम ठिकाणी अधिक तुकड्या अशा उपाययोजना आखल्या आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.