Paytm वरील बंदी प्रतिस्पर्ध्यांच्या पथ्यावर, PhonePe सह 'या' अ‍ॅप्सची डिमांड; डाउनलोड २० ते ५० % वाढले

Paytm वरील बंदी प्रतिस्पर्ध्यांच्या पथ्यावर, PhonePe सह 'या' अ‍ॅप्सची डिमांड; डाउनलोड २० ते ५० % वाढले

पेटीएम पेमेंट बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातल्याचा चांगलाच फायदा पेटीएमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना झाला आहे.

पेटीएम पेमेंट बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातल्याचा चांगलाच फायदा पेटीएमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना झाला आहे. पेटीएमचे प्रतिस्पर्धी, फोनपे, BHIM आणि Google Pay यांसारखे ॲप डाउनलोड करण्याचे प्रमाण वाढले असून ग्राहक पर्यायांच्या शोधात असल्याचे समोर येत आहे.

फोनपेच्या डोउनलोडमध्ये जबरदस्त वाढ

३ फेब्रुवारी रोजी 'फोनपे'चा अँड्रॉइड डाउनलोडचा आकडा २.७९ लाख झाला. २७ जानेवारी रोजीच्या १.९२ लाखाच्या तुलनेत एकाच आठवड्यात ४५ टक्के वाढ नोंदवली गेली, असे अ‍ॅप इंटेलिजन्स फर्म 'अ‍ॅपफिगर'ने 'मनीकंट्रोल'ला दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे. ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत, फोनपे ॲपच्या अँड्रॉइड डाउनलोडमध्ये २४.१ टक्क्यांनी वाढ होऊन ते १०.४ लाख झाले, जे मागील आठवड्यात (२४ जानेवारी- २७जानेवारी) याच कालावधीत फक्त ८.४ लाख डाउनलोड होते.

PhonePe Business चीही मोठी उडी

अलीकडच्या काही दिवसांत, PhonePe ने ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग सुरू केली असून यामुळे कंपनी भारतातील Google Play Store आणि Apple App Store वरील मोफत ॲप्स श्रेणीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. PhonePe चे व्यवसाय-केंद्रित ॲप PhonePe Business ची लोकप्रियताही वाढली आहे. गुगल प्लेवर फोनपे बिझनेस ३१ जानेवारी रोजीच्या १८८ व्या स्थानावरून 5 फेब्रुवारी रोजी भारतात थेट ३३ व्या स्थानी पोहोचला, तर App Store वर, ३१ जानेवारी रोजी २२७ व्या स्थानावरून ५ फेब्रुवारी रोजी ७२ व्या स्थानी पोहोचला.

BHIM ची डिमांड वाढली

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) ॲपच्या मागणीतही वाढ झाली असून ३ फेब्रुवारी रोजी अँड्रॉइड डाउनलोडचा आकडा १.३५ लाख झाला. २७ जानेवारी रोजीच्या १.११ लाखच्या तुलनेत आठवड्यात २१.५ टक्के वाढ झाली. ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत, BHIM ॲपच्या अँड्रॉइड डाउनलोडमध्ये ५० टक्क्यांनी वाढ होऊन ती ५.९३ लाख झाली आहे, जी मागील आठवड्यात (२४ जानेवारी ते २७ जानेवारी) याच कालावधीत ३.९७ लाख डाउनलोड होती. याशिवाय, BHIM अॅप भारतातील गुगल प्लेवर ५ फेब्रुवारी रोजी थेट सातव्या स्थानी आले. १९ जानेवारी रोजी ते ३२६ व्या स्थानी होते. तर, ऍप स्टोअरवरही, १९ जानेवारी रोजीच्या १७१ व्या स्थानावरून ५ फेब्रुवारी रोजी थेट ४० व्या स्थानावर झेप घेतली आहे.

गुगल पेच्या डाउनलोडमध्येही वाढ

गुगल पेच्या डाउनलमोडिंगमध्येही वाढ झालीये. ३ फेब्रुवारी रोजी डाउनलोडिंगचा आकडा १.०९ लाख झाला, २७ जानेवारी रोजी १.०४ लाख डाउनलोड्सच्या तुलनेत आठवड्यातून ४.९ टक्के वाढ झाली. ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत, गुगल ॲपच्या अँड्रॉइड डाउनलोडमध्ये ८.४ टक्के वाढ होऊन ती ३.९५ लाख झाली आहे, जी मागील आठवड्यात (२४ जानेवारी-२७जानेवारी) याच कालावधीत ३.६४ लाख डाउनलोड होती.

logo
marathi.freepressjournal.in