

नवी दिल्ली: अंमली पदार्थांची तस्करी करणारी जाळे मोडून काढण्यासाठी तीन वर्षात मोडून काढण्यात येईल. यासाठी तीन वर्षांचा आराखडा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केला.
नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरच्या १० व्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवताना गृहमंत्र्यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट ऑन ड्रग कंट्रोल (२०२६-२०२९)’ आणि ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो वार्षिक अहवाल-२०२५’ प्रकाशित केला. तसेच, जम्मू आणि गुवाहाटी येथील एनसीबीच्या विभागीय कार्यालयांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.
शहा म्हणाले की, हे व्हिजन डॉक्युमेंट सिंथेटिक ड्रग्ज, डार्कनेट-आधारित तस्करी, सीमापार तस्करी आणि इतर उदयोन्मुख धोक्यांविरुद्ध संस्थात्मक क्षमता मजबूत करण्यावर भर देते.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही पुढील तीन वर्षांत संपूर्ण अंमली पदार्थ व्यापारावर इतक्या निर्णायकपणे प्रहार करू की, ती पुढील अनेक दशके सावरू शकणार नाही,’ असे शहा म्हणाले.
त्यांनी अंमली पदार्थ विरोधी अधिकाऱ्यांना देशातील अंमली पदार्थांचा दहशतवाद मोडून काढण्यासाठी ‘ओळखा, विस्कळीत करा आणि नष्ट करा’ हे धोरण स्वीकारण्यास सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला तीन प्रकारच्या टोळ्यांचा खात्मा करायचा आहे. जे देशात अंमली पदार्थ आणतात, जे सीमेवरून राज्यांपर्यंत पुरवठा करतात आणि जे मानवी व तांत्रिक गुप्तचरांचा वापर करून राज्यांमधून शेवटच्या ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहोचवतात.’
शाह यांनी सर्व मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना त्यांच्या राज्यातील गुन्ह्यांचा तपशील एनसीबीच्या पोर्टलवर वेळेत अपलोड करण्याचे आवाहन केले, जेणेकरून केंद्र सरकार त्याचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देऊ शकेल. ही लढाई कोणत्याही एका विभागाची नसून, सर्वांनी एकत्रित येऊन 'ड्रग-मुक्त भारत' करण्याचे ध्येय गाठले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.